मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमणे जमीनदोस्त
भाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांना शंभर दिवसाच्या आखून दिलेल्या सात कलमी कार्यक्रमानुसार पदपथ मुक्त करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत दुकाने, टपऱ्या, स्टॉल्स जमीनदोस्त करण्याची कारवाई केली.
मीरा-भाईंदर महापालिका अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घेऊन विशेष मोहीम राबवीत मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या १० अनधिकृत टपऱ्या, आरसीसीचे पक्के बांधकाम असलेली ५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. तसेच क्रेनच्या सहाय्याने पान टपऱ्या, पेपर विक्रेत्यांचे स्टॉल उचलण्यात आले. सदर कारवाई मीरा-भाईंदर महापालिका कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.