सेंट मेरीज आयसीएसई शाळेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील सेंट मेरीज आयसीएसई शाळेने आपल्या २५ वर्षांच्या वाटचालीचा रौप्य महोत्सव नुकताच वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात दिमाखात साजरा केला. या ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सेंट मेरीज आयसीएसई शाळेच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करताना राज्यपालांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने घेतलेल्या पुढाकारांची प्रशंसा करत भविष्यात या शाळेची प्रगती अधिक उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते रौफ्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत शाळेच्या गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची माहिती देण्यात आली आहे. याप्रसंगी शाळेचे माजी प्राचार्य, समिती सदस्य, आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर शाळेचे उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यू यांनी आपल्या स्वागतपर भाषणात शाळेचा २५ वर्षातील प्रवास उलगडून सांगितला.
कार्पामाच्या अध्यक्षस्थानी मुंबई ऑर्थोडॉक्स डायोसीसचे मुख्य बिशप आणि एमओसीसीबी संस्थेचे व्यवस्थापक ग्रेस गीवरघिस मार कुरिलोस होते. तसेच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे, नवी मुंबईचे पोलीस परिमंडळ-२ चे उपायुक्त प्रशांत मोहिते, एमओसीसीबीचे सचिव रेव्ह. फादर थॉमस चाको आणि सीईओ रेव्ह. फादर अब्राहम जोसेफ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, मुंबई ऑर्थोडॉक्स डायोसीसचे मुख्य बिशप आणि एमओसीसीबी संस्थेचे व्यवस्थापक गीवरघिस मार कुरिलोस यांनी सांगितले की, हा रौफ्यमहोत्सव म्हणजे केवळ एका टफ्फ्याचा उत्सव नाही, तर आपल्या संस्थेच्या मूल्यांची, ध्येयांची आणि संकल्पनांची साक्ष आहे. भविष्यातही या गौरवशाली प्रवासाला यशाची नवी उंची देण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.
सेंट मेरीज आयसीएसई शाळेचा रौफ्यमहोत्सव हा एक प्रेरणादायी क्षण होता, ज्याने शाळेच्या शैक्षणिक कामगिरीला आणि सामुदायिक योगदानाला नवा आयाम दिला आहे. हा सोहळा शाळेच्या यशस्वी वाटचालीचा साक्षीदार ठरल्याची भावना यावेळी प्राचार्या ब्लेसी मॅथ्यू यांनी आभार प्रदर्शनात व्यक्त केली.