कौटुंबिक वादावर ‘सुकून प्रकल्प'ची मात्रा

नवी मुंबई : पती-पत्नीमधील वादासह अन्य कौटुंबिक वादाची संख्या दाखल होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांमध्ये समुपदेशकांच्या माध्यमातून वाद मिटवण्यासाठी बेलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात सुकून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण मुंबई आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मार्फत १ फेब्रुवारी पासून सुकून समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पती-पत्नीमधील वाद सामंजस्याने कसे सोडवता येतील, एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर देखील त्यांच्यातील संबंध सुसह्य कसे राहतील, यासह इतर कौटुंबिक वादावर टीस संस्था द्वारा नियुक्त समुपदेशक प्रयत्नशील राहणार आहेत.  

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या हस्ते सुकून प्रकल्पाचे उद्‌घाटन १ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. यावेळी न्यायमूर्ती डॉ. रचना तेहरा यांच्यासह न्यायालयातील सर्व न्यायाधीश आणि वकील मंडळी उपस्थित होते.

कौटुंबिक वादामुळे व्यक्तींमध्ये निर्माण होणारा मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी ‘टीआयएसएस'ने ‘महाराष्ट्र राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण'च्या (एमएसएलएसए) समन्वयाने सुकून प्रकल्प विकसित केला आहे. सुकून कौन्सिलिंग सेंटर ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस'च्या ‘स्कूल ऑफ ह्युमन इकोलॉजी'चा एक फील्ड ॲक्शन प्रोजेक्ट आहे. बेलापूर न्यायालयातील सहाव्या मजल्यावरील कुटुंब न्यायालयाच्या आवारात सुकून समुपदेशन केंद्राला जागा आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, सुकून प्रकल्प सुरु करणारे बेलापूर पाचवे न्यायालय असणार आहे.  

सद्यस्थितीत सुकून समुपदेशन केंद्र आठवडयातून एक दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर समुपदेशनाच्या कालावधीत वाढ होणार आहे. समुपदेशनाकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, सदर सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या केंद्रात समुपदेशन करण्यास येणाऱ्या पती-पत्नींची आणि कौटुंबिक वादातील अन्य व्यक्तींची माहिती गोपनिय ठेवली जाणार आहे. बेलापूर कौटुंबिक न्यायालयात सध्या १८०० पेक्षा अधिक कौटुंबिक प्रकरणे प्रलंबित असून, या प्रलंबित प्रकरणातील व्यक्तींचे सुकून समुपदेशन केंद्रात समुपदेशन केले जाणार आहे.

बेलापूर कौटुंबिक न्यायालयात विवाह समुपदेशकाच्या मार्फत जोडप्यांचे समुपदेशन करण्यात येत असले तरी, सुकून प्रकल्पातील समुपदेशकाद्वारे देखील कौटुंबिक वाद असलेल्या जोडप्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. सुकून समुपदेशन केंद्रात कौटुंबिक वाद असलेल्या जोडप्यांचे अथवा व्यक्तींचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्यांवर जागरुकता आणण्यासाठी कार्यशाळा देखील आयोजित केली जाणार आहे.  

कौटुंबिक वादामुळे जे जोडपे एकत्र राहू इच्छित नसेल तर वेगळे झाल्यानंतर देखील भविष्यात त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा वाद उद्‌भवू नये, ते चांगले तणावरहीत रहावेत, त्यांचे आयुष्य सुकून राहावे यासाठीच या प्रकल्पाचे नाव सुकून ठेवण्यात आले आहे. सुकून प्रकल्पांतर्गत स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप देखील आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांमधील तज्ञ सदस्यांचे पॅनल निर्माण करण्यात आले आहे. कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित प्रकरणातील दोन्ही वादी-प्रतिवादींनी सुकून समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.
-न्यायमूर्ती डॉ. रचना तेहरा, बेलापूर कौटुंबिक न्यायालय. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेंट मेरीज आयसीएसई शाळेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा