पंचरत्न मित्र मंडळाने शैक्षणिक साहित्य वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी

आगरवाडी येथील म.न.पा. हिंदी शाळेमध्ये ‘पंचरत्न मित्र मंडळ' या गेली अठरा वर्षे समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेने ‘राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायजर्स लि.' या भारत सरकारच्या कंपनीच्या सहकार्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शेक्षणिक साहित्य तसेच शाळेसाठी पंखे, स्टील कपाट, वॉटर प्युरिफायर, खाऊ यांचे वाटप ३० जानेवारी रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात केले. या वेळी विचारमंचावर आर.सी.एफ.चे सीसी ॲण्ड सीएसआर महाव्यवस्थापक मधुकर पाचारणे, विपणन महाव्यवस्थापक शशिकांत हेडाऊ, ‘नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत, डॉ. विनित गायकवाड, संस्थेचे सल्लागार धनंजय खामकर, डॉ.रजनीश कुमार, ‘पंचरत्न मित्र मंडळा'चे अध्यक्ष अशोक भोईर आदि उपस्थित होते.

‘पंचरत्न'चे सारे पदाधिकारी हे भावना, संवेदना जपणारे असून त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांची नेमकी गरज ओळखून हे मदतकार्य केले याबद्दल मधुकर पाचारणे यांनी प्रशंसोद्‌गार काढले. या मंडळाने नेहमीच उपेक्षित, शोषित घटकांना सहकार्याचा हात देऊन त्यांचा दुवा घेतल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना राजेंद्र घरत यांनी आपल्या मनोगतातून व्यवत केली. आज जशी मदत ‘पंचरत्न मित्र मंडळा'ने तुम्हाला केली तशीच मदत तुम्ही मोठे, स्वतंत्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर समाजातील अन्य कमकुवत घटकांना करा असे आवाहन यावेळी शशिकांत हेडाऊ यांनी शालेय विद्याथ्यार्ंशी हितगुज साधताना केले. आरसीएफ चा उत्कृष्ट कामगार २०२४' हा पुरस्कार मिळालेल्या ‘पंचरत्न'चे सहसचिव वैभव घरत यांचा तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थी व सदर कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कारही यावेळी भेटवस्तू देऊन करण्यात आला. सूत्रसंचालनाची जबाबदारी संस्थेच्या सहसचिव स्नेहा नानिवडेकर यांनी सांभाळली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कौटुंबिक वादावर ‘सुकून प्रकल्प'ची मात्रा