वाहतूक पोलिसांची सतर्कता अन् रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा!
नवी मुंबई : घणसोली रेल्वे स्टेशन येथून रिक्षाने खारघर येथे जाणाऱ्या गुणाजी बोंबले याचे ४ तोळ्याचे दागिने आणि २० हजार रुपये असलेली बॅग गडबडीत रिक्षामध्ये राहिली होती. मात्र, कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी अवघ्या २ तासात सदर रिक्षाचा शोध घेऊन बोंबले याला त्याची बॅग परत केली आहे. वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या कार्यत्परतेमुळे गहाळ झालेले दागिने आणि रोख रक्कमेची बॅग बोंबले याला परत मिळाल्याने त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.
घणसोली येथे राहणारा गुणाजी बोंबले ३० जानेवारी रोजी दुपारी पत्नीच्या दवाउपचारासाठी ४ तोळे सोने आणि २० हजार रुपयांची जमवाजमव करुन रिक्षाने खारघर येथे मेव्हण्याकडे चालला होता. त्यासाठी बोंबले याने घणसोली स्टेशनच्या बाहेरुन रिक्षा पकडली होती. बोंबले खारघर येथे पोहोचल्यानंतर दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग रिक्षामध्ये विसरुन तो मेव्हण्याच्या घरी निघून गेला. काही वेळानंतर रिक्षामध्ये आपली बॅग राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत सदर रिक्षा निघून गेली होती. त्यामुळे बोंबले याने सदर रिक्षाचा शोध घेण्यासाठी पुन्हा घणसोली गाठले. त्याठिकाणी सुध्दा त्याला ती रिक्षा न सापडल्याने हताश आणि व्याकुळ झालेल्या बोंबले याने मोठ-मोठ्याने रडण्यास सुरुवात केली.
यावेळी कोपरखैरणे वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांना सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बोंबले याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्याने दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे सांगितले. त्यानंतर कोपरखैरणे वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घणसोली रेल्वे स्थानक लगतच्या दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी करुन बोंबले याने जी रिक्षा पकडली होती, त्या रिक्षाचा नंबर आणि मोबाईल नंबर शोधून काढला. त्यानंतर वाशीमध्ये असलेल्या सदर रिक्षा चालकाला कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले.
रिक्षा चालक देखील प्रामाणिकपणे बोंबले याची रिक्षामध्ये राहिलेली बॅग घेऊन कोपरखैरणेत आला. यावेळी गुणाजी बोंबले याने आपली बॅग ओळखल्यानंर कोपरखेरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी सदरची बॅग बोंबले याचीच असल्याची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर बॅग त्याच्याकडे सुपूर्द केली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे तसेच रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग परत मिळाल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.