यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई नाही -मुख्याधिकारी गायकवाड

बदलापूर : बदलापूर शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण कारवाईत अनावधानाने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई झाली. मात्र, यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचे जप्त साहित्यही त्यांना परत केले जाईल, असे आश्वासन ‘कुळगाव-बदलापूर नगरपरिषद'चे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिले आहे.

मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या आदेशाने प्रशासनातर्फे शहरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरु आहे. बदलापूर पूर्व मधील काही भागात कारवाई केल्यानंतर २९ जानेवारी रोजी बदलापूर पश्चिम येथील स्थानक परिसर, बाजारपेठ भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई शहरात महापालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले होते. पुढे ठाणे महापालिकेनेही अशाच प्रकारे वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण दिले होते. मात्र, बदलापुरात कारवाई का? असा प्रश्न वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर ‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'च्या सदस्यांनी ३० जानेवारी रोजी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांवर झालेल्या  कारवाईबाबत चर्चा करताना ‘यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर अशी कारवाई केली जाणार नाही, तसेच ज्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे साहित्य जप्त झाले आहे ते त्यांना परत केले जाईल' असे आश्वासन मुख्याधिकारी गायकवाड यांनी ‘प्रेस वलब'च्या सदस्यांना दिले.

बदलापूर शहरात वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देणारे आदेश द्यावेत, अशीही मागणी ‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'च्या वतीने करण्यात आली. याबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले. त्यामुळे शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी ‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'चे अध्यक्ष विजय पंचमुख, सचिव संजय साळुंके, सागर नरेकर, अनिल मिश्रा, संकेत सबनीस, तन्मय तांबे, तन्मय सोहोनी आणि इतर सहकारी उपस्थित होते.

‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'च्या बोधचिन्हाचे अनावरण...
‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'च्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. वारली व्यक्तीच्या हातात लेखणी असे बोधचिन्ह आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार वासुदेव बोंद्रे यांनी सदर बोधचिन्ह साकारले आहे. सर्वसामान्यासाठी सर्वसामान्याने हाती घेतलेली लेखणी अशी संकल्पना आहे. दरम्यान, ‘प्रेस क्लब ऑफ बदलापूर'च्या कायम पाठीशी असल्याचे सांगत मुख्याधिकारी गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक पोलिसांची सतर्कता अन्‌ रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा!