प्रश्नपत्रिका फुटल्या नसल्याचा ‘एमपीएससी'चा दावा

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘एमपीएससी'तर्फे उद्या २ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्या नसून त्या सुरक्षित असल्याचा दावा ‘एमपीएससी'ने केला आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून पैशांची मागणी करणाऱ्या टोळ्यांना उमेदवारांनी बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन ‘एमपीएससी'च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी पत्रकार परिषदमध्ये केले.

३० जानेवारी रोजी पुणे मधी,ल स्थानिक वृत्तपत्रामध्ये ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग'तर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ या परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील बातमी प्रसिध्द झाल्याने उमेदवारांमध्ये खळबळ उडाली. काही भ्रमणध्वनी क्रमांकावरुन उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात आहे. तसेच काही उमेदवारांकडे ओरिजनल डॉक्युमेंट मागून पैसे हप्त्याहप्त्याने देण्याबाबतचे रेकॉर्डिंगही सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. परिणामी, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

सदर बातमीच्या आणि सोशल मिडीयावर फिरत असलेल्या रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने ‘एमपीएससी'ने ३० जानेवारी रोजी तातडीने पत्रकार परिषद बोलावून २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. काही उमेदवारांनी अशा प्रकारचे फोन आल्याबाबतच्या तक्रारी‘एमपीएससी'कडे केल्या असून या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली.

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग'तर्फे २ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या परीक्षा नमूद वेळापत्रकानुसार संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करत उमेदवारांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी
[email protected] या ई-मेलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन ‘एमपीएससी'द्वारे करण्यात आले आहे.

४८० पदांकरिता २ लाख ८६ हजार अर्ज...
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ अंतर्गत ४८० पदे भरली जाणार असून त्याकरिता २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. यामध्ये गृह विभागाकडून पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) २१६ जागा भरल्या जाणार असून जीएसटी विभाग तर्फे राज्य कर निरीक्षकाच्या (एसटीआय) २०९ जागा भरल्या जाणार आहेत. तर मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांच्या (एएसओ) ५५ जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, ४८० पदांकरिता मुलाखतीसाठी एकूण पदाच्या १२ पट म्हणजेच ५७६० उमेदवारांना पाचारण केले जाणार आहे.

परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त...
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ. सुवर्णा खरात यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यापुढे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई नाही -मुख्याधिकारी गायकवाड