उल्हासनगरच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी मंजूर
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, नवीन रुग्णालय, वाढीव पाणीपुरवठा, नवीन उड्डाणपल यासह अन्य विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आणि आमदार कुमार आयलानी यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘'जिल्हा नियोजन समिती'च्या बैठकीस उल्हासनगर महापालिका आयुक्त आव्हाळे आणि आमदार आयलानी शहराचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करुन त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले आहे. २९४ पैकी ८ इमारती अतिधोकादायक आहेत. ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतींचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरु होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. प्रभाग समिती क्र-१ मध्ये सर्वाधिक ९७ इमारती धोकादायक असून प्रभाग समिती क्र-२ मध्ये ७१, प्रभाग समिती क्र-३ मध्ये ७३ तर प्रभाग समिती क्र-४ मध्ये ५३ इमारती धोकादायक आहेत. त्यातील ५० इमारती खाली करुन त्याची दुरुस्ती सुचविली असून २२ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यातील धोकादायक इमारतींमध्ये विस्थापित झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.
उल्हासनगर शहरातील ८५५ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने अध्यादेश जारी करुन या अनधिकृत बांधकामांना दंड आकारणी करुन नियमित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र, त्यात महापालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या अटी-शर्ती यामुळे सदर प्रक्रिया थंडावली आहे. यासाठी शासनाने सहकार्य करावे.
उल्हासनगर शहरात लोकसंख्या जवळपास ७ लाख ३० हजार एवढी असून सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा ‘एमआयडीसी'द्वारे करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येनुसार सदरचा पाणीपुरवठा १४० एमएलडी करण्यात यावा, उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कल्याण-कर्जत महामार्गावर उल्हासनगर शहरातील शांतीनगर ते साईबाबा मंदिर जवळ एक नवीन उड्डाणपुल बांधण्यात यावा, महापालिकेची नवीन इमारत, विविध रस्ते, अँटिलिया श्री विसर्जन घाटाला पर्यटन क्षेत्र घोषित करणे, उल्हासनगर शहरापर्यंत मेट्रो रेल्वे मार्ग करण्यात यावा, मध्यवर्ती रुग्णालयाचा विस्तार करुन ४०० खाटांची व्यवस्था करणे, तेथील डायलिसिस विभागात आरओ प्लांट बसवणे याविषयीची चर्चा नियोजन समिती बैठकीत झाली.
उल्हासनगर महापालिकेची सध्या अस्तित्वात असलेली इमारत जीर्ण झाली असून महापालिकेची नवीन सुसज्ज इमारत बांधण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आ. कुमार आयलानी आणि आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी बैठकीत केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०० कोटी रुपयांचा निधी प्राधान्याने दिला जाईल, असे सांगितले.
सदर बैठकीस जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव अशोक शिनगारे, ‘भाजपा'चे प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आ. संजय केळकर, आ. कुमार आयलानी, आ. सुलभा गायकवाड, आ. निरंजन डावखरे, आ. किसन कथोरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, केडीएमसी आयुवत डॉ. इंदु राणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आवळे, आदि उपस्थित होते.