कडेवर मुलं, डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात
डोंबिवली : गेली १५ वर्ष पाणी टंचाईचा सामना करत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांनी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. कडेवर मुलं आणि डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी किती दिवस वणवण करावी लागणार? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. टिटवाळा इंद्रानगर साईदर्शन कॉलनीमधील ४ ते ५ हजार कुटुंबियांची पिण्याच्या पाण्याची समस्या कधी दूर होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिटवाळ्यातील इंद्रानगर परिसरात महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. कडेवर लहान मुलं, डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या या महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत राहतात. पाणी पुरवठ्याचा अभाव असूनही नळाला पाणी येत नसले तरी महापालिकेचे बिल मात्र या परिसरातील कुटुंबांना भरावे लागत आहे. येथील महिलांना पहाटे आपले काम आवरुन पाण्याच्या शोधात निघावे लागत आहे. या संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने परिसरातील कुटुंबियांना बोअरींगच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. बोअरींगचे दुषित पाणी पिऊन परिसरातील मुले, महिला आणि वयोवृध्द गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. गेल्या १५ वर्षांपासून पाण्याची समस्या कायम असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.