बांग्लादेशी घुसखोरांबाबत किरीट सोमय्या आक्रमक; कल्याण तहसिलदारांची भेट
कल्याण : कल्याण तालुक्यामध्ये तब्बल १२५० बांग्लादेशी रोहिंग्यांनी विविध कागदपत्रांसाठी अर्ज सादर केले असल्याचे सांगत राज्यात घुसखोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून २ राजकीय नेते आणि २ अतिरेकी संघटनांचा त्याला पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यातील बांग्लादेशी रोहिंग्यांचा प्रश्न उचलत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २९ जानेवारी रोजी ‘कल्याण'चे तहसिलदार सचिन शेजाळ यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी सदर गंभीर दावा केला. यावेळी सोमय्या यांच्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.
२ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे कारस्थान महाराष्ट्रात रचण्यात आले आहे. साधारणपणे ६ महिन्यांपूर्वी त्याचे नियोजन करण्यात आले असून कल्याण तालुक्यात तब्बल १२५० जणांचे अर्ज आल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली. सदर २ लाखांपैकी १.२३ लाख जणांना भारतात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले असून १९ हजार जणांच्या अर्जाला मंजुरी मिळाली होती. मात्र, या कट कारस्थानाचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमला जातो, त्याच धर्तीवर जुन्या वर्षीच्या जन्म प्रमाणपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
तसेच सदर सर्व कारस्थानामागे मोठी गँग कार्यरत असून त्यामध्ये २ राजकीय पुढारी, २ अतिरेकी संघटनांचे नेते आणि २ बांग्लादेशी एजंट या ६ जणांमार्फत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात राबवण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. त्यासाठी मालेगाव एपीएमसीच्या नावाचा वापर करुन १९३ कोटी रुपये काढण्यात आले असून त्यातील ५० कोटी रुपये या घुसखोरांची कागदपत्रे बनवण्यासाठी वापरण्यात आल्याची माहितीही सोमय्या यांनी दिली.
सदर सर्व प्रकरणाची चौकशी ‘एटीएस'कडून सुरु करण्यात येत असून प्रशासकीय सहभाग आढळल्याप्रकरणी ‘मालेगांव'चे २ तहसीलदार निलंबित करण्यात आले आहेत. या सर्व तहसीलदारांना सगळ्या अर्जांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून २ लाख घुसखोरांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.