काळी पिवळी मीटर टॅक्सी, ऑटो रिक्षा भाडेदरात वाढ

मुंबई : ‘मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण'च्या २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) आणि ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदिंमध्ये वाढ झाल्यामुळे ‘प्राधिकरण'ने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) आणि ऑटोरिक्षांची भाडेदरवाढ करण्यास ‘राज्य परिवहन प्राधिकरण'च्या २३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) आणि ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील. भाडेदर सुधारणा १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल.

ज्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारित भाडेदरानुसार भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन करुन घेतील, त्या ऑटोरिक्षा, टॅक्सी यांना भाडेवाढ लागू होईल. भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२५ पर्यंत करुन घेणे आवश्यक राहिल. (भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टॅरिफ कार्ड ३० एप्रिल २०२५ पर्यंतच अनुज्ञेय राहिल.)  

‘एमएमआरडीए'च्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आणि लास्ट माईल कनेक्टqविटी अनुषंगाने नवीन २ काळी-पिवळी मीटर टॅक्सी स्टॅण्ड, ६८ ऑटोरिक्षा स्टॅण्ड आणि ९ शेअर-ए ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यास ‘प्राधिकरण'ने मान्यता दिली आहे. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) आणि ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने ‘खटुआ समिती'ची स्थापना केली होती. ‘समिती'ने सादर केलेल्या अहवालास शासनाने ९ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाद्वारे मान्य केले आहे. त्यानुसार काळी-पिवळी मीटर टॅक्सी आणि ऑटोरिक्षा भाडे निश्चितीच्या सुत्रानुसार आणि वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदि बाबी विचारात घेऊन भाड्याची परिगणना केली जाते. मोटार वाहन कायदा, १९८८ कलम ६८ अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे.

असे आहेत सुधारित दरः
काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. १८.६६  रुपये वरुन २०.६६ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रुपये २८ रुपये वरुन ३१ रुपये भाडेदर असणार आहे.

कुल कॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये २६.७१ वरुन ३७.२० रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रुपये ४० वरुन ४८ रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.

ऑटोरिक्षा (सीएनजी)साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये १५.३३  रुपये वरुन १७.१४ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी भाडे रुपये २३ वरुन २६ रुपये भाडेदर असणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बांग्लादेशी घुसखोरांबाबत किरीट सोमय्या आक्रमक; कल्याण तहसिलदारांची भेट