मिरा-भाईंदरचा हवामान कृती आराखडा जाहीर
भाईंदरः शहरातील प्रदुषणाला आळा घालून २०४७ पर्यंत शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने नियोजनपूर्व उपाययोजनात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती आराखडा २९ जानेवारी रोजी हवामान कृती कार्यशाळेत जाहीर करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदरझपाट्याने विकसित होणारे शहर आहे. २००५ ते २०२२ दरम्यान शहराचा बांधकाम क्षेत्रफळ ५०.०५ टक्केने वाढले असून हरित क्षेत्र १३.६ टक्के पर्यंत घटले. या शहरी विस्तारामुळे वार्षिक तापमान ०.४६ सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे पूरस्थिती, पाणी समस्या, वाहतूक कोंडी आदि समस्या वाढल्या आहेत. शहरात विविध प्रकारे कार्बनचे उत्सर्जन होत असते. ग्रीन हाऊस गॅस मूल्यांकनानुसार स्थिर ऊर्जेमुळे ६२ ट क्के कार्बनचे तर वाहतुकीमुळे २२ टक्के आणि कचरा क्षेत्रामुळे १६ टक्के कार्बनचे उत्सर्जन होत असते. सदर समस्या सोडविण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून सीइजीपी फाउंडेशनने ज्ञान भागीदार म्हणून योगदान दिले आहे.
कृती आराखडा जाहीर कार्यक्रमप्रसंगी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ‘महाप्रीत'चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाली आणि ‘आगा खान एजन्सी'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा, आदि उपस्थित होते. तसेच कार्यशाळेत महापालिका उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, नगरसचिव वासुदेव शिरवळकर, मुख्य लेखा परीक्षक सुधीर नाकाडी तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
मुंबई आणि त्यांच्या सलग्न शहरांमध्ये विविध शहरी समस्या निर्माण झाल्या असून, नवी आव्हाने समोर येत आहेत. जगातील प्रमुख शहरांची तुलना मुंबईसह केल्यावर लक्षात येते की, मुंबईत सव्रााधिक हरित पट्टा आहे, मात्र तरी वायू प्रदुषणात आपले स्थान सर्वोच्च. याचे कारण वाढती वाहने यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तसेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने नियोजनपूर्ण उपाययोजनात्मक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटीबध्द असून त्यासाठी विविध प्रकारची पावले उचलली जात आहेत.
-प्रवीण परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन.
मिरा-भाईंदर शहरात शाश्वत विकास व्हावा, सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅनद्वारे विविध उपाययोजनात्मक पावले उचलून शहरात प्रत्यक्ष पर्यावरणपूरक जीवनशैली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच होम २० सारख्या उपक्रमांद्वारे उत्सर्जन कमी केले जाणार आहे. शहरांचा कशाप्रकारे शाश्वत विकास होऊ शकतो, ते मिरा-भाईंदरमधील सर्व उपक्रमांमधून दिसून येईल.
-संजय काटकर, आयुक्त-मिरा भाईंदर महापालिका.