सखोल स्वच्छता मोहिमांद्वारे स्वच्छता कार्याला गती

नवी मुंबई : सखोल स्वच्छता मोहिमा राबवितांना रस्त्याच्या कडेला असलेली माती उचलून स्वच्छतेसोबतच हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्याकडेही नवी मुंबई महापालिका मार्फत विशेष लक्ष दिले जात आहे. १३ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ कालावधीतील स्वच्छता पंधरवड्यानंतरही विभागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह तसेच सुरु ठेवण्यात आले आहेत.

यामध्ये वाशी विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली सेवटर-१० येथील मिनी सीशोअर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि पर्यटन स्थळ म्हणून गजबजलेला सदर परिसर सखोल स्वच्छ करण्यात आला. त्यासोबतच वाशी विभागातील सायन-पनवेल महामार्गाचा भागही स्वच्छ करण्यात आला.

अशाच प्रकारची मोहीम कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे यांच्या नियंत्रणाखाली महापे गांव आणि परिसरात राबविण्यात आली. या अंतर्गत महापे गांव आणि गांवठाण येथील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत वाटा आणि परिसर यामध्ये डीप क्लिनिंग करण्यात आली. बेलापूर विभागात सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली अपोलो सिग्नलपासून नमुंमपा मुख्यालयापर्यंत आम्रमार्गावर स्वच्छता करण्यात आली. उरण, उलवे आणि जेएनपीटी कडे जाणाऱ्या जड वाहनांची या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर रहदारी नियमित सुरु असल्याने याठिकाणी माती आणि रेती रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर जमा होताना दिसते. त्यादृष्टीने या रस्त्याची नियमित सखोल स्वच्छता करण्याचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी केली जात आहे. याअंतर्गत रस्त्याच्या कडेला जमा खडी, धूळ, माती उचलून घेण्यात आली. तसेच मॅकेनिकल स्वीपिंग मशीनद्वारे पदपथावर आणि कडेला पाणी मारुन धुळीला अटकाव करण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सखोल स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत असून याद्वारे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही महत्वाच्या घटकांची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली काळजी घेण्यात येत आहे. या सखोल स्वच्छता मोहिमांमध्ये अनेक ठिकाणी नागरिकही सहभागी होताना दिसत असून त्यामध्ये एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

प्लास्टिक बंदीबाबत सोसायट्यांमध्ये मार्गदर्शन...

नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरण, प्लास्टिक पासून होणारे दुष्परिणाम, कंपोस्ट पीटस्‌ची सोसायटीच्या आवारात निर्मिती करुन कचऱ्याच्या विल्हेवाटीची उपाय योजना, थ्री आर आणि त्याची सेंटर्स अशा विविध विषयांवर सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छता जनजागृती कार्यास बेलापूर विभागात सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वच्छता आपल्या घरी, संदेश घेऊन महापालिका आपल्या दारी' असा संदेश देत बेलापूर, सेवटर-२७ येथील ओम सिध्दी सोसायटी येथे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सर्व नागरिकांसमवेत प्लास्टिक बंदीबाबत सामुहिक शपथ घेण्यात आली. तसेच सोसायटीतील मुलांनी राबविलेल्या प्लास्टिक बँक उपक्रमाचेही मान्यवरांसह उपस्थितांनी कौतुक केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याणकर नागरिक-क्रीडाप्रेमींचा कपील पाटील यांना घेराव