कोकणातील हापूस आंबा एपीएमसी मार्केट मध्ये दाखल
वाशी : हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंबा हंगामाला उशिराने सुरुवात होणार असला तरी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात २७ जानेवारी रोजी कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हापूस आंबा आवक होण्यास सुरुवात झाल्याने या आंब्यांची विधिवत पूजा करुन हापूस आंबा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. ४ ते ६ डझन हापूस आंबा पेटीला १० हजार ते १५ हजार रुपये दर मिळाला आहे.
यंदा हापूस आंबा उत्पादन चांगले असणार आहे. मात्र, हवामान बदलामुळे हापूस आंबा हंगामाला उशिराने सुरुवात होणार असून, येत्या १५मार्चनंतर मोठया प्रमाणात हापूस आंबा आवक वाढेल, असे मत एपीएमसी) फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
दरवर्षी जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. डिसेंबर मध्ये तुरळक हापूस आंबा पेट्या दाखल होण्यास सुरुवात होत असते. मात्र, यंदा हवामान बदलाने हापूस आंबा उत्पादनाला फटका बसला आहे. फळधारणा सुरु असलेल्या आंब्याचे नुकसान झाले आहे. हापूस आंब्याला मोहोर फुटण्याची वेळ आणि हवामान बदल, परतीचा पाऊस तसेच कडाक्याची थंडी त्यामुळे अतिमोहोर फुटला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी हापूस आंबा फळधारणा झाली नाही. तर थ्रिप्स रोगामुळे देखील मोहोर गळून गेला. त्यामुळे सुरुवातीच्या हापूस आंबा उत्पादनाला फटका बसला. आता पुन्हा नव्याने मोहोर फुटला असून, हवामानावर हापूस आंबा उत्पादन अवलंबून आहे, अशी माहिती हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. यंदा हापूस आंबा आवक चांगली आवक होणार असून, हंगामाला मात्र विलंब होणार आहे. मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी येत्या मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. २७ जानेवारी रोजी एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या हापूस आंब्याची ४ ते ६ डझनाची एक पेटी १० हजार ते १५ हजार रुपये बाजारभावाने विक्री झाली आहे.
वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात २७ जानेवारी रोजी हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या आहेत. हवामान बदल आणि पावसामुळे यंदाच्या सुरुवातीच्या हापूस आंबा उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा हापूस आंबा हंगामाला एक महिना उशिराने सुरुवात होत आहे. मात्र, १५ मार्च २०२५ नंतर बाजारात हापूस आंबा आवक वाढणार असून, बाजारात तुरळक प्रमाणात हापूस आंबा आवक राहून दर चढे राहतील. मात्र, येत्या मार्च मध्ये आवक वाढताच हापूस आंबा दर आवाक्यात येतील. - संजय पानसरे, संचालक - फळबाजार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी).