परदेशी पक्षी पाणथळी जागेच्या शोधात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यंत पक्षी जाण्याचा धोका
उरण : जैवविविधतेने नटलेल्या आणि पक्षी निरीक्षणाचे ठिकाण असलेल्या उरण तालुवयातील खाडीकिनारी हजाराेंच्या संख्येने परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. मात्र, उरण तालुवयातील पाणथळी जागा मातीचा भराव करुन बुजविण्यात येत आहेत. याशिवाय आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने उरण मधील अनेक पाणथळी जागा कोरडया झाल्या आहेत. परिणामी अनेक पक्षी आता नव्या पाणथळी जागा शोधत आहेत. सध्या पलेमिंगो पक्ष्यांनी उरण रेल्वे स्थानक आणि शेवा गावाच्या परिसरातील पाणथळी जागांकडे मोर्चा वळविला आहे. यात उरण तालुवयातील सर्वात मोठ्या पाणजे येथील वादग्रस्त २८९ हेक्टर पाणथळ परिसरात येणारे आंतरभरती पाण्याचे प्रवाह बंद करण्यात आल्याने सदर पाणथळ जागा कोरडी झाली आहे.
पर्यावरणवाद्यानी पाणथळ जागा कोरड्या झाल्याबाबत पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे. परदेशी स्थलांतरित पक्षी येण्याचा सध्याचा काळ आहे. त्यामुळे पाणथळी जागा कोरड्या झाल्याने पक्षी संख्या घटण्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जैवविविधता निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १७६व्या क्रमांकावर आहे. उरण तालुवयातील जेएनपीए बंदर परिसर, पाणजे, भेंडखळ आणि बेलपाडा येथील पाणथळी जागा कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे या परिसरात येणारे परदेशी पक्षी त्यांचे खाणे आणि पाणी असलेल्या नव्या ठिकाणाचा शोध घेत आहेत. उरण रेल्वे स्थानक आणि नवीन शेवा गाव यांच्या मध्ये असलेल्या पाणथळ जागेत पलेमिंगो दर्शन होत आहे, अशी माहिती तेलिपाडा येथील नागरिक अशोक म्हात्रे यांनी दिली.
उरणमध्ये ३० स्थलांतरित पक्ष्यांसह किमान ५० प्रजातींचे पक्षी आकर्षित करणारी पाणजे पाणथळ जागा आता आंतरभरती पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात मृत पावत आहेत, असे मत अशोक म्हात्रे यांनी व्यक्त केले.
पाणजे पाणथळ जमीन नष्ट झाल्याने समुद्र भरतीच्या येणाऱ्या पाण्यामुळे उरण तालुवयात आपत्ती ओढवू शकते. खरेतर, आंतर भरतीयुक्त ओलसर जमीन पुरल्यामुळे गावांमध्ये आधीच अवेळी पूर येत आहेत. त्यामुळे सरकारने पाणथळ जागांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाणजे पाणथळ जमिनीचे संवर्धन करावे, असे साकडे अशोक म्हात्रे यांनी घातले आहे.
खारफुटीच्या अस्तित्वामुळे पाणथळ जागा म्हणजे सीआरझेड क्षेत्र आहे, असे सरकारी आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. भरतीच्या पाण्याचा प्रवाह अविरत असला पाहिजे, असे मतही अशोक म्हात्रे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, उरण परिसरातील नैसर्गिक पाणथळी जागा नष्ट होऊ लागल्याने विदेशी पक्षी उरण पासून पुढे सरकत सरकत नवी मुंबई विमानतळ परिसरात येण्याची शक्यता पक्षीप्रेमींद्वारे व्यक्त केली जात आहे.