आपली मराठी भाषा अभिजातच - प्रा. प्रवीण दवणे

विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण

ठाणे : ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त ठाणे महापालिका तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला. या निमित्ताने कवी, साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे ‘मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी. जी. गोदेपुरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, आदि उपस्थित होते.

जे ईश्वर असते ते अभिजात, जे संपत नसते ते अभिजात. अभिजाततेला सुरुवात नाही, ती परंपरा आहे. मराठी भाषा काल परवा निर्माण झालेली नाही, ती पूर्वापार चालत आलेली आहे. मातृभाषेवर जो निस्सीम प्रेम करतो, तो जगातील प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली, प्राणवायू सारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचे प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी यावेळी केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, हे आपले भाग्यच. भाषा केव्हा निर्माण झाली ते आपल्याला सांगता येणार नाही. मराठीत बोलायचे असते, बोलावे लागते याची चर्चा पूर्वी नव्हती, पण पुढे काय बिनसले. भाषेचे सुध्दा मार्केटींग करता येते, ते क्लृप्तीबाजांना कळले असावे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचे महत्व वाढत असताना मराठी भाषेचेही तितकेच टोकाचे आहे, तेे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही प्रा. दवणे यांनी व्यक्त केली.

मराठीतील नामवंत लेखक देखील उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे होते. पण, त्यांनी व्यक्त व्हायला मराठी भाषेचे माध्यम वापरले. याचे कारण म्हणजे यंत्रभाषा, तंत्रभाषा म्हणून इंग्रजीचे महत्व ते नाकारत नव्हते. मात्र, व्यक्त होण्यासाठी आईचीची भाषा सोपी वाटायची. आतल्या आत नसा तुटाव्यात, संवेदना विखुरल्या जाव्यात असे सध्या भाषेचे झाले आहे. आताच्या पिढीची भाषा त्रिभंगलेली असल्याचे प्रा. दवणे यांनी नमूद केले.

संवर्धन म्हणजे विकास. ‘सं' संस्कारतेचा आहे. नुसते मराठी बोलणे उपयोगी नाही तर मराठी संस्कृतीतील कलाकृतीचा आनंद घेता आला पाहिजे. मराठी भाषा हरवणे म्हणजे जगण्यातील विद्यापीठ हरवणे आहे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे चांगली मराठी भाषा सुध्दा जगण्याची गरज असल्याचे प्रवीण दवणे यांनी नमूद केले. संत, शाहिरांनी अजरामर केलेली मराठी भाषा, भाषेचे अनेक पैलू, अर्थासह उलगडून दाखवले. गद्य, पद्य, विद्राही साहित्यात वापरले जाणारे मराठी शब्द यांचाही उल्लेख त्यांनी केला.

मराठी भाषा टिकणारच आहे, पुढची मराठी भाषा महाराष्ट्रगातील बोलीभाषा आणि ग्रामीण भाषा यामुळे जगणार आहे. समृद्ध होणार आहे. भाषेच्या श्रीमंतीत जगायचे असेल तर घराला वाचनाचा चौरंग हवा, भाषा सुंदर असून तिच्याकडे जिव्हाळ्याने पहा, असेही दवणे यांनी उपस्थितांना सांगितले.

भाषेचा अभिजात दर्जा अभिमानाने मिरवूया -जिल्हाधिकारी शिनगारे

दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषा समृधआद करण्यामध्ये माझा किती सहभाग आहे, याची जाणीव जरी प्रत्येकाने ठेवली तरी आपली मायमराठी समृध्द होणार आहे. मराठी भाषेचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे. त्यामुळे कायमच आपली मराठी भाषा आब राखणारी आहे. त्यामुळे मराठी भाषेला या राज्य सरकारने जो अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, तो आपण अभिमानाने मिरवूया. या प्रक्रियेमध्ये आपला हातभार सातत्याने लावत राहूया. कळत-नकळत, जाणीवपूर्वक आपली भाषा अभिजात करुया, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले.

विविध उपक्रमांचे आयोजन

मराठी भाषा पंधरवडा निमित्त ठाणे महापालिका तर्फे १४ जानेवारीपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रा. निर्मोही फडके यांच्या जगू मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानाने ‘पंधरवडा'चे उद्‌घाटन झाले. त्यानंतर महापालिका परिसरात ‘ग्रंथदिंडी'चे आयोजन करण्यात आले होते. तसेच नवीन आणि जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाची कार्यशाळाही या काळात आयोजित करण्यात आली होती.

त्याचबरोबर,शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्य वाचन, गद्य वाचन, वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध लेखन, हस्ताक्षर, शुध्दलेखन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचे परीक्षण शालेय स्तरावर करण्यात आले. तर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्पर्धांचे परीक्षण लेखक मकरंद जोशी (शुध्दलेखन स्पर्धा), चित्रकार विजय बोधनकर (सुलेखन-हस्ताक्षर स्पर्धा), पत्रकार आणि निवेदक राजेंद्र पाटणकर (निबंध स्पर्धा), लेखिका तथा अभिनेत्री हर्षदा बोरकर आणि पत्रकार अजित मांडके (वक्तृत्व स्पर्धा) यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

परदेशी पक्षी पाणथळी जागेच्या शोधात