‘कोल्ड प्ले' नंतर पहाटेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम
लाखो लोक नवी मुंबईत येऊनही शहर स्वच्छतेवर कोणताही परिणाम होऊ न दिल्याने नवी मुंबई महापालिकेची प्रशंसा
नवी मुंबई : नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी संपन्न झालेला ‘कोल्ड प्ले'चा आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय संगीतमय कार्यक्रम अनुभविण्यासाठी देशभरातून तसेच विविध देशांतून लाखो संगीत रसिक नवी मुंबईत येऊनही घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे शहर स्वच्छतेवर कोणताही परिणाम न झाल्याचे चित्र जगासमोर आले.
त्यामुळे नवी मुंबईच्या स्वच्छतेविषयी जागरुकतेचे नवी मुंबईकर नागरिक आणि कार्यक्रमासाठी आलेले विश्वभरातील संगीत रसिक यांनी कौतुक केलेच; याशिवाय जगभरातील प्रसिध्दी माध्यमांनीही याची दखल घेत या बाबतचे वृत्ते प्रसारित करुन दखल घेतली. कार्यक्रमाच्या ४ दिवसांमध्ये तब्बल ८२ टन १५० किलो इतका मोठ्या प्रमाणावरील कचरा स्टेडिअम परिसर आणि नेरुळ विभागातून रात्री १० ते सकाळी ३ वाजेपर्यंत चारही दिवस विशेष मोहीम राबवून संकलित करण्यात आला.
संकलीत कचऱ्यामध्ये ३३ टन ३७५ किलो ओला कचरा आणि ४८ टन ४७५ किलो सुका कचरा असा एकूण ८२ टन १५० किलो कचरा गोळा करुन तो ‘नमुंमपा'च्या शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
याशिवाय स्टेडिअमच्या अंतर्गत भागातील स्वच्छताकर्मी यांनी संकलीत केलेला २० टनाहून अधिक कचराही प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या प्रक्रल्पस्थळी नेण्यात आला. त्यासाठी कचरा वाहतूक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
‘कोल्ड प्ले'चा लोकप्रिय कार्यक्रम पाहण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने संगीत रसिकांची उपस्थिती असेल ते लक्षात घेत नवी मुंबईच्या स्वच्छ शहर नावलौकिकाला बाधा पोहोचू नये अशा रितीने सदर कार्यक्रम ‘शून्य कचरा' कार्यक्रम स्वरुपात साजरा करण्याकरिता ‘नमुंमपा'तर्फे सूक्ष्म नियोजन केले होते. त्या नियोजनानुसार कार्यक्रमस्थळाच्या अंतर्गत भागात दुपारी २ वाजल्यापासून १५० हून अधिक परिसर सखींच्या सहयोगाने कचऱ्याचे वर्गीकरण ३ दिवस सुरु ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे १० वाजता कार्यक्रम संपल्यानंतर स्वच्छता समुहांच्या वतीने स्टेडीयम आणि त्या परिसरातील मुख्य रस्ते यांची सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दिनांकनिहाय कचरा संकलनः
१९ जानेवारी ११.९२५ टन ओला कचरा, ४.२७५ टन सुका कचरा
२० जानेवारी ३.१५० टन ओला कचरा, ९.७०० टन सुका कचरा
२१ जानेवारी ८.९३० टन ओला कचरा, २६.३५० टन सुका कचरा
२२ जानेवारी ९.६७० टन ओला कचरा, ८.१५० टन सुका कचरा