देशी संत्री - मोसंबी फळांना वाढती मागणी
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात नोव्हेंबर महिन्यापासून देशी नागपूरी मोसंबी आणि संत्री या फळांच्या हंगामाला सुरुवात होते. वातावरणात आता उष्मा जाणवत असल्यामुळे रसाळ फळांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे मागणी प्रमाणे पुरवठा अपुरा पडत असल्याने किरकोळ बाजारात देशी संत्रा,मोसंबी दरात प्रतिकिलो दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
एपीएमसी घाऊक फळ बाजारात वर्षाच्या बाराही महिने मद्रास येथील आंबट मोसंबीची आवक होत असते. मात्र, खाण्यासाठी नागरीक आकाराने लहान आणि चवीला गोड असलेल्या देशी मोसंबीला अधिक पसंती देतात. नोव्हेंबर पासून एपीएमसी घाऊक फळ बाजारात देशी नागपूर, अमरावती, जालना मधील गोड मोसंबी दाखल होण्यास सुरुवात होत असते. अमरावती, नागपूर, औरंगाबाद, विदर्भातून दाखल होणारी देशी संत्री, मोसंबी आकाराने लहान आणि चवीला गोड असते. मद्रास मधील मोसंबी आकाराने मोठी आणि चवीला आंबट असते. मद्रासी मोसंबी जास्तीत जास्त रसाकरीता वापरली जाते. मात्र, नागपूरची गोड मोसंबी नागरिक आवडीने खात असतात. हिवाळ्यात संत्रा आणि मोसंबी यांना अधिक मागणी असते. फेब्रुवारी २०२५ पर्यत संत्राचा हंगाम सुरु राहणार आहे. एपीएमसी घाऊक फळ बाजारात अमरावती, नागपूर, विदर्भातून मोसंबी ५०४ क्विंटल तर संत्री १२१८ क्विंटल दाखल झाली आहे. घाऊक बाजारात संत्री आणि मोसंबी प्रतिकिलो ४० ते ८० रुपये तर किरकोळ बाजारात संत्री १२० ते १३०रुपये आणि मोसंबी १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.