‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाची दशकपूर्ती

ठाणे : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पध्दतींना प्रतिबंध करण्यात तसेच मुलींचे संरक्षण आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमाला २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने महिला आणि बाल विकास विभाग तर्फे ठाणे जिल्हा परिषद प्रांगणात २२ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमाला दहा वर्ष पुर्ण होत असून, स्त्रियांचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, असे मनोगत या कार्यक्रमात ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यवत केले.

यावेळी ‘ठाणे जिल्हा परिषद'च्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, महिला आणि बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, ठाणे जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, लघुपाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार यांच्यासह ‘ठाणे जिल्हा परिषद' मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

‘मी प्रतिज्ञा करते / करतो की, मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेल आणि स्त्रीभ्रूण हत्येचे कृत्य करणाऱ्यांना विरोध करेन. मी मुलीच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेसाठी सदैव कटीबध्द राहीन. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' या राष्ट्रीय अभियानात सहभागी होवून अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहीन', अशी सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक' अभियान