दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर करावा
नवी मुंबई : मराठी भाषेला २ हजार वर्षांपासूनचा इतिहास असून अभिजात भाषा म्हणून त्यावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब झाले याचा मराठी भाषिक म्हणून अभिमान बाळगत असताना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर केला पाहिजे, असे मत साहित्यिक कवी डॉ. महेश केळुसकर यांनी व्यक्त करीत मराठी भाषेची महती विविध उदाहरणे देत उलगडली.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘मायबोली अभिजात मराठी' विषयावरील व्याख्यानातून डॉ. महेश केळुसकर यांनी मराठीचा जागर केला.
भाषेचे प्रमुख कार्य संदेशवहन असून आपल्या बोलण्याचा अर्थ ऐकणाऱ्याला कळावा याकरिता कोणत्याही भाषेची प्रमाण भाषा महत्वाची असते. मराठीच्या ६८ बोलीभाषा या तिच्या रक्तवाहिन्या आहेत. महाराष्ट्रात मराठी भवन असावे आणि त्यामध्ये बोलीभाषांचे प्राधिकरण स्थापन व्हावे. तसेच याद्वारे मराठी भाषेला समृध्द करणाऱ्या बोलीभाषांचा अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. केळुसकर यांनी सांगितले. मराठी भाषा विषयक काम करणारी शासनाची सर्व कार्यालये एकाच छताखाली असतील तर परस्पर समन्वय राहून भाषेच्या विकासाला अधिक गती मिळेल, असेही ते म्हणाले.
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असते असे जगभरचे शिक्षणतज्ञ सांगतात. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मराठीतून शिक्षण अंगीकारले पाहिजे. सध्याचा काळ प्रसिध्द व्यक्तींचे अनुकरण करण्याचा काळ असून विविध क्षेत्रात प्रसिध्द मराठी व्यक्तींनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे. जेणेकरुन त्यांचे अनुकरण मराठी चाहते करतील, असा वेगळा विचार महेश केळुसकर यांनी मांडला.
७२ देशांमध्ये मराठी बोलली जाते, १५ विद्याापीठांमध्ये शिकवली जाते आणि १२ कोटीहून अधिक लोक मराठीत बोलतात. त्यामुळे मराठी संपली अशी ठोकली जाणारी बोंब अनाठायी असल्याचे सांगत डॉ. महेश केळुसकर यांनी मराठी भाषेची तुलना नवजात अर्भकाला निकोप वाढीसाठी आवश्यक असलेल्या आईच्या दूधाशी केली.
यावेळी डॉ. महेश केळुसकर यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘चंद्र' आणि विंदा करंदीकर यांची ‘धोंडया न्हावी' या कविता सादर केल्या. तसेच ‘झिनझिनाट' या स्वतःच्या गाजलेल्या कवितेने त्यांनी व्याख्यानाची सांगता केली.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका भाषा विकासासाठी शासकीय सोपस्कार म्हणून कार्यक्रम न करता आत्मियतेने कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे कौतुक करीत डॉ.केळुसकर यांनी मराठी भाषेचे अभिजातपण सिध्द झाल्यानंतर त्याचा लौकिक वाढविणे आपली जबाबदारी असून प्रत्येकाने त्यासाठी आपल्या परीने संपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.