भाषा माणसांमधील आदर वाढविण्याचे महत्त्वाचे साधन -अच्युत पालव
ठाणे : भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले लिहिता आले पाहिजे, चांगले वाचता आले पाहिजे आणि चांगले बोलता आले पाहिजे. ज्याला ते साध्य होते, त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो. भाषा माणसांमधील आदर वाढविण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अच्युत पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती-जनसंपर्क) उमेश बिरारी, आदि उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने ठाणे महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २० जानेवारी रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला. त्याला महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कागद, रंग, सुलेखनाची साहित्ये आणि जोडीला खुसखुशीत शब्दांतील विवेचन असे पालव यांच्या कार्यशाळेचे स्वरुप होते. मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रम पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले. सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधने, लेखणी, रंग त्याविषयी त्यांनी उपस्थित मार्गदर्शन केले.
सुलेखनातील सरळ रेषांचा सराव माणसाच्या मनातील तणाव दूर करणे, दोन माणसांमध्ये किती अंतर असते याचे भान दर्शवतात. शिस्त आणि एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात, असे पालव यांनी स्पष्ट केले. मराठी अक्षरे, नावे, गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.