स्थिर सरकारच्या दृष्टीने स्वागतार्ह निकाल !
अस्थिर सरकार हे कुठल्याही राज्याच्या दृष्टीने, विकास-औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने हानिकारक ठरतअसते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल हा स्वागतार्हच ठरतो. गेल्या ५ वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय घटना या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या होत्या आणि त्या राजकीय तमाशाला सर्वच्या सर्वच राजकीय पक्ष व नेते जबाबदार होते. अस्थिर सरकारच्या पुनरावृत्तीच्या भीतीने महाराष्ट्रातील मतदारांनी अगदी युतीचे उमेदवार पात्र वाटत नसतानादेखील अनिच्छेने मतदान केलेले आहे.
गेल्या ५ वर्षात केवळ १३१ दिवसाचे काम विधानसभेत झाले. कारण सर्वच राजकीय पक्ष व नेते हे राजकीय कुरघोडी करण्यातच व्यस्त होते. सरकार महायुतीचे की महाआघाडीचे हा मुद्दा मागील ५ वर्षातील दोन्ही सरकारची कामगिरी पाहता गौण ठरतो कारण दोघांचीही कामगिरी ही एकाला झाकावा तर दुसरा उघडा पडतो अशा प्रकारची होती. त्यामुळे महायुतीला मिळालेला विजय हा त्यांच्या कामाची पावती म्हणून मिळालेला नसून दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीने मतदारांनी विचार करून किमान पुढील ५ वर्षात तरी मागील ५ वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये, पुन्हा तोडफोडीचे राजकारण नको आणि केंद्रातील मदतीने चालू असणाऱ्या विकास कामांना ब्रेक लागू नये या दृष्टीने दिलेला कौल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारच्या कामगिरीपेक्षा लाडकी बहीण योजना व आरएसएसचा सक्रिय सहभाग व लोकसभेत मिळालेल्या यशाने हुरळून जाऊन आत्मविश्वासाचे अहंकारात झाल्याने गाफील झालेली महाआघाडी याचे हे यश म्हणता येईल. मतदारांनी महाआघाडीला मत द्यावे; यासाठीचे मुद्दे जनतेसमोर मांडू न शकल्याने पदरी पडलं आणि पवित्र मानलं अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना व तत्सम कल्याणकारी योजनाना ग्राह्य मानत मतदारांनी महायुतीला कल दिलेला दिसतो. अस्थिर सरकारची पुनरावृत्तीच्या भीतीने महाराष्ट्रातील मतदारांनी अगदी युतीचे उमेदवार पात्र वाटत नसताना देखील अनिच्छेने मतदान केलेले आहे आणि त्यातून महायुतीला लागलेली लॉटरी आहे हे विसरता काम नये.
महायुतीचे सरकार असो की महाविकास आघाडीचे दोन्ही सरकारची जनतेप्रती, जनतेच्या मूलभूत समस्या-प्रश्नाविषयी अनास्था , सरकारच्या प्रामाणिकतेवर असणारे प्रश्नचिन्ह या बाबी लक्षात घेता महाराष्ट्रातील बुद्धिवादी मंडळी, सामाजिक संस्था यांनी अत्यंत सक्रियपणे सरकारच्या कामकाजावर तिसरा डोळा ठेवणे काळाची गरज वाटते. वर्तमान निकाल हा ना युतीचा विजय आहे ना आघाडीचा पराभव. स्थिर सरकारच्या दृष्टीने उपलब्ध पर्यायांपैकी एका पर्यायाला दिलेला सुज्ञ कौल आहे. भविष्यात तरी महायुती व आघाडीने जात-पात -धर्म अशा धृवीकरणाला खतपाणी घालू नये आणि राज्याचे भवितव्य टांगणीवर लावू नये ही अपेक्षा. त्याच बरोबर ईव्हीएमला दोष देण्याचा रडीचा डाव खेळू नये. याच ईव्हीएम नेलोकसभेत विजयी कौल दिला होता हे विसरू नये. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की कुठलीही पडताळणी न करता अर्ज करील तो पात्र अशा दृष्टीने राज्याला आर्थिक अस्थिरतेच्या खाईत लोटणाऱ्या राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण सारख्या तत्सम योजनांमुळे मतदारांना लुभावण्याची परंपरा भविष्यात लोकशाहीच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते याचादेखील विचार होणे आवश्यक आहे. मी व्यक्तिगत पातळीवर कोणत्याही राजकीय पक्षाचा अंधभक्त, निरक्षर चाहता नाही आणि त्यामुळेच मागील ५ वर्षाचा कार्यकाळ पाहून राज्याच्या दृष्टीने कोणतेही का असेना, स्थिर सरकार हवे या दृष्टीने हा स्वागतार्ह मानतो. - सुधीर लक्ष्मीकांत दाणी