अनुसंधान अखंड राखावे

‘सत' तत्त्वाच्या अस्तित्वाचा निश्चय बिघडला की सदाचरणावरचा विश्वास उडतो. मनाचा कल सहजपणे अधोगतीकडे असतो. त्याने माणसाचे अधःपतन होते. करू नये ते केले की होऊ नये ते होते. याचा परिणाम म्हणजे केवळ दुःख, शोक, संताप, उद्विग्नता. भगवंताचे अनुसंधान सुटले की माणूस दुःखाच्या चक्रव्यूहात अडकतो. सुखाच्या मार्गापासून भरकटतो.

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला।
बळे अंतरी शोक संताप ठेला।
सुखानंद आनंद भेदे बुडाला।
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला । श्रीराम। ६२

‘निज' म्हणजे आपले, स्वतःचे. ‘निजध्यास' म्हणजे आपल्या स्वतः च्या स्वरूपाचा ध्यास. अर्थात परमात्मस्वरूपाचा ध्यास. भगवंताचे अनुसंधान. ते राखायचे सोडून जर माणूस जगात व्यर्थ वाद-विवाद करत राहिला तर दुःख, अशांती, असमाधान बळेच अंतःकरणात मुक्कामाला येतात. काम, क्रोध इ. मनाच्या शत्रूंना आपण प्रयत्नपूर्वक बाहेर घालवून वृत्तींना भगवंतापाशी एकाग्र करण्याचा अभ्यास सुरू केलेला असतो. ही साधकावस्था मानली जाते. मात्र एकाग्रता टिकून राहण्यासाठी प्रयत्नांचे सातत्य जरूरी आहे. उपासनेत खंड पडू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागते. काही कारणाने असा खंड पडला आणि त्याने काहीही बिघडत नाही, ‘चालतं' अशी वृत्ती वाढीस लागली की समस्या उद्‌भवतात.
जगातील विषयांचा ओढा जबरदस्त असतो. प्रपंचातील कर्तव्ये, जबाबदाऱ्या नित्य उभ्या ठाकत असतात. हे टाळणे अवघड असते. या परिस्थितीत उपासना टाळणे सोपे जाते. मग रोज काहीतरी निमित्त होऊन साधनेकडे दुर्लक्ष होते. आपल्याला स्वरूपाची गोडी तर लागलेली असते.पण तिथे पुरेसे लक्ष देता येत नाही याची खंतही वाटते. याचे कारण आपला निश्चय कमी पडतो. दृढता कमी पडते. त्यामुळे दुःख होते. करायचे असून करता येत नाही या विचाराने संताप होतो. आत्मानात्म विवेक करण्यात कमी पडल्यामुळे प्रापंचिक गोष्टींना प्राधान्य दिले जाते. प्रपंच मुळातच दुःखदायक असल्याने त्यापासून सुख, आनंद मिळेल ही अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. साधकावस्थेत ज्ञानाचा मार्ग दिसलेला असतो, पण ज्ञान पूर्णपणे हाती आलेले नसते. सर्व संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात. अर्धवट ज्ञानामुळे शंका उपस्थित करणे, वाद घालणे हे प्रकार होतात. त्यातून अर्थातच समाधान होत नाही. अहंता दुखावली जाते.त्याने शोक होतो. जीवाचा संताप होतो. स्वरूपाचे अनुसंधान तुटले की जगाला सन्मुख झालेल्या माणसाला पुन्हा सर्वत्र भेद दिसू लागतो. ‘माझे-तुझे' ही वृत्ती बळावते. स्वार्थ डोके वर काढतो. स्वार्थाने अंध झालेल्या माणसाला आपल्या अंतर्यामी असलेला आनंद दिसत नाही. द्वेष, मत्सर जागृत झाल्यावर दुसऱ्यावर मात केली तरच आपल्याला यश मिळेल, त्या यशात आपला आनंद आहे अशी विपरीत बुध्दी होते. विपरीत बुध्दीमुळे निर्णय चुकतात. त्यातून शोक, संताप निर्माण होतो. मनासारखे काही होत नाही, सुख लाभत नाही असा अनुभव येताच भगवंतावरील श्रध्दा डळमळीत होऊ लागते. ‘तो आहेच' हा निश्चय अस्थिर होतो. ‘सत' तत्त्वाच्या अस्तित्वाचा निश्चय बिघडला की सदाचरणावरचा विश्वास उडतो.

मनाचा कल सहजपणे अधोगतीकडे असतो. त्याने माणसाचे अधःपतन होते.करू नये ते केले की होऊ नये ते होते. याचा परिणाम म्हणजे केवळ दुःख, शोक,संताप, उद्विग्नता. भगवंताचे अनुसंधान सुटले की माणूस दुःखाच्या चक्रव्यूहात अडकतो. सुखाच्या मार्गापासून भरकटतो. म्हणून समर्थांचा आग्रह आहे की भगवंताचे स्मरण सोडू नये. नामस्मरणाचा नेम मोडू नये. अनुसंधान टिकवण्यासाठी नित्य सत्संगतीचे आणि श्रवणाचे महत्त्व खूप आहे .संतांना आत्मज्ञानाचा साक्षात्कार होऊन अखंड आनंदाचा ठेवा सापडलेला असतो. तो मिळवण्याचा मार्ग ते जाणतात. त्या मार्गावरचे खाचखळगे, वळणे, अपघातप्रवण जागा त्यांना परिचित असतात. तिथून सुखरूप पुढे कसे जायचे हे त्यांना निश्चित माहीत असते.कृपावंत संत आपण सुखरूपपणे आपले ध्येय ‘आत्मज्ञान', ‘आत्मसुख', ‘मोक्ष' या मुक्कामावर पोहचावे यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात. वेळोवेळी सावध करतात. म्हणून त्यांच्याशी वाद न घालता, त्यांच्या अनुभवसिध्द बोधावर श्रध्दा ठेवून त्यांचे ऐकावे. त्यांनी सांगितलेली उपासना, साधना दृढपणे करावी. अन्यथा संसारतापाने मनुष्य पोळून निघतो. संसारातील कोणताही पदार्थ, वस्तु, व्यक्ती त्याचे समाधान करू शकत नाहीत. ते सामर्थ्य फक्त संतांचे आहे. सर्व शंका,आग्रह सोडून त्यांना शरण जावे आणि शाश्वत आनंदाचा लाभ करून घ्यावा. त्यातच आपले संपूर्ण कल्याण आहे.
 जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

देशाच्या संविधानाला निवडणुका घेऊन जाहिर श्रद्धांजली?