मोरबे धरणावर विनापरवानगी जलपुजन
‘काँग्रेस'चे महापालिका प्रशासनाला निवेदन
नवी मुंबई : प्रतिबंधित असलेल्या मोरबे धरणाच्या अंर्तगत परिसरात अनधिकृतरित्या प्रवेश करतानाच महापालिकेची परवानगी न घेता जलपुजन करणारे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह उपस्थित माजी नगरसेवक आणि इतरांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली ‘काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण २३ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता काठोकाठ अगदी १०० टक्के भरल्याने महापालिका प्रशासनाकडून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे महापालिकेकडून २४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यानंतर मोरबे धरण भरल्याची माहिती नवी मुंबईकरांना देण्यात आली. महापालिकेने प्रसिध्द केलेली मोरबे धरणाबाबतची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली.
आज २६ सप्टेंबर रोजी महापालिका प्रशासनाकडून मोरबे धरण स्थळी जलपुजनही करण्यात येणार होते. परंतु, कोणतेही शासकीय पद नसणारे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर यांच्यासह ‘भाजपा'चे अन्य माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी २४ सप्टेंबर रोजी मोरबे धरण परिसरात प्रवेश करुन धरणाच्या पाण्याचे जलपुजन केले. सध्या नवी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्याने प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज बघत आहेत. महापालिकेने २६ सप्टेंबर रोजी जलपुजन नियोजित केलेले असतानाही संजीव नाईक, सागर नाईक यांनी मोरबे धरण क्षेत्रात प्रवेश करुन जलपुजन केले. त्याची छायाचित्रेही सोसल मिडीयावर प्रसिध्द झालेली आहे, असे ‘काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांना आयुवत नार्वेकर यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
वास्तविक पाहता मोरबे धरणाच्या कार्यक्षेत्रात कोणाही सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे. सदर परिसर पूर्णपणे प्रतिबंधित विभाग आहे. येथे महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, महापालिका प्रशासनाला पूर्वसूचना न देता संजीव नाईक, सागर नाईक आणि सहकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या मोरबे धरण क्षेत्रात प्रवेश करुन अनधिकृतपणे केवळ आणि केवळ प्रसिध्दीसाठी मोरबेच्या जलपुजनाची स्टंटबाजी केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या संख्येने प्रवेश करण्याचे आणि जलपुजन करण्याचा नियोजित प्रकार बेकायदेशीर असून महापालिका प्रशासनाला न जुमानणारा आहे. उद्या कोणताही राजकीय घटक, पक्षसंघटना कधीही मोरबे धरणक्षेत्रात प्रवेश करून स्टंटबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटनांना पायबंद बसलाच पाहिजे. त्यामुळे कायद्याचा भंग करणारे संजीव नाईक, सागर नाईक आणि इतरांविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘काँग्रेस'च्या वतीने सदर निवेदनातून महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासन विभागाचे उपायुवत शरद पवार यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासह माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, जिल्हा प्रववता तथा ‘नेरुळ ब्लॉक तालुका काँग्रेस'चे अध्यक्ष रविंद्र सावंत, ‘ओबीसी सेल'चे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष मल्हार देशमुख, माजी नगरसेविका मीरा पाटील, जिल्हा सचिव विद्या भांडेकर, अरविंद नाईक, आबा सोनवणे, सचिन नाईक, रामराजे, नसीर हुसेन आणि इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.