लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने गुणवंत खेळाडूंना व कलावंतांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अशाच प्रकारे नुकत्याच झालेल्या आशियाई महिला चषक फुटबॉल स्पर्धेचा माहोल ताजा असल्याने त्या पार्श्वभूमीवर 02 ते 04 मार्च 2022 या कालावधीमध्ये फुटबॉल प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते.

विदयार्थ्यांमध्ये विशेषत: मुलींमध्ये फुटबॉल या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने फुटबॉल प्रिमियर लीगकरिता महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रति विभागातील 1 याप्रमाणे विभागनिहाय एकूण 10 संघाची निवड करण्यात आली. या 10 संघांमधून 70 विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा गुणांचे प्रदर्शन केले. 10 संघांतील प्रत्येक संघास 4 सामने खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये त्यामध्ये रबाळे, ऐरोली, कोपरखैरणे व सानपाडा हे 4 विभाग उपांत्य फेरीत दाखल झाले होते.

त्यामधून रबाळे विभागाच्या महिला फुटबॉल संघाने ऐरोली विभागाच्या महिला फुटबॉल संघावर 2 - 0 अशी थेट मात करीत विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. कोपरखैरणे व सानपाडा विभागातील सामन्यात कोपरखैरणे विभागाने 1 - 0 अशी मात करीत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.

लीगमधील सर्वोत्तम गोल किपर म्हणून सानपाडा विभागाच्या सुनिता प्रधान तसेच लीग मधील सर्वोत्तम गोल स्कोअरर म्हणून ऐरोली विभागाच्या शिवानी जैस्वाल यांनी वैयक्तिक पारितोषिके मिळविली. या 4 दिवसांच्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी कोपरखैरणे विभागाची राबिया शेख, दुस-या दिवशी रबाळे विभागाची काजल सरोज व तिस-या दिवशी रबाळे विभागाची अंबिका सिंग या महिला खेळाडूंनी दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (प्लेअर ऑफ द डे) म्हणून पारितोषिके पटकाविली.

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, नवी मुंबई पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड, क्रीड व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त मनोजकुमार महाले, शिक्षण विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार, वैद्यकीय आऱोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धा नवी मुंबई महानगरपालिकेने निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण मैदानात खेळविण्यात आल्याने या खेळाडू मुलींनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला. 

Read Next

सीकेटी कॉलेज तर्फे रौप्य महोत्सव निमित्त आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा संपन्न