लोंबकळणाऱ्या तारांवर महापालिका तर्फे कारवाई
वाशी : लोंबकळणाऱ्या तारेमुळे एका नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्याचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आल्याने नवी मुंबई शहरात लोंबकळणाऱ्या तारांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत असल्याने नवी मुंबई शहरातील नागरिकांची इंटरनेटची गरज वाढल्याने इंटरनेट जोडणीची मागणी वाढली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी विद्युत खांब तसेच झाडांवर बेसुमार इंटरनेट तसेच इतर तारा टाकण्यात आल्याचे चित्र दिसते. मात्र, सदर तारा या वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेकदा या तारांमध्ये अडकून पक्षीही जखमी होत आहेत. लटकणाऱ्या तारेत पाय अडकल्याने २४ जून रोजी दुचाकीवरुन कामावर जाणाऱ्या अमर सावंत यांचा सीबीडी येथे अपघात झाला. तारेमध्ये पाय अडकून खाली पडले असता पाठीमागून आलेल्या कारने अमर सावंत यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमर सावंत यांच्यावर उपचार सुरु असताना, पाच दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील लोंबकळणाऱ्या तारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई शहरात लोंबकळणाऱ्या तारांवर जोरदार धडक कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर इतर महापालिका अधिकाऱ्यांनी नवी मुंबई शहरातील लोंबकळणाऱ्या तारा काढण्याकडे पाठ फिरवल्याने परिस्थिती ‘जैसे थे' झाली. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्याला हकनाक जीव गमवावा लागला.