पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 मध्ये 2 सुवर्णपदक पटकावले
नवी मुंबई : अमेरिका येथील बर्मिंगहॅम, आलाबामा येथे सुरु असलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत नवी मुंबईतील पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी दोन सुवर्णपदकांची घवघवीत कमाई करत संपूर्ण देशाचे नाव उज्वल केले आहे. सुभाष पुजारी यांनी बॉडी बिल्डिंग (172 सेमी उंची गट) व मेन फिजिक या दोन प्रकारांमध्ये सुवर्ण पदक मिळवून भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने फडकवला आहे. या आधीही पुजारी यांनी 10 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या दोन सुर्णपदकामुळे त्यांच्या यशस्वी वाटचालीतील आणखी एक मोलाची भर पडली आहे
अमेरिका येथील बर्मिंगहॅम, आलाबामा येथे 26 जून ते 6 जुलै दरम्यान वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 ही स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत 76 देशांतील स्पर्धक सहभागी झाले आहेत. याच प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी बॉडी बिल्डिंग व मेन फिजिक या दोन प्रकारांमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेसाठी पुजारी यांनी दररोज सहा तास कठोर सराव केला. मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सराव केला.
सुभाष पुजारी यांच्या या कामगिरीमुळे नवी मुंबई, महाराष्ट्र पोलीस दल तसेच संपूर्ण देशाचा सन्मान जागतिक व्यासपीठावर वाढवला गेल्याने त्यांच्यावर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी मित्र, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.