‘संविधान'चे जतन करणे आवश्यक -आयुक्त अभिनव गोयल
कल्याण : संविधान जिवंत डॉक्युमेंट (दस्ताऐवज) म्हणून सर्वांनीच ‘संविधान'चे जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.
शासनाच्या निर्देशानुसार ‘आणिबाणी'च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अत्रे रंगमंदिरातील संपन्न झालेल्या कार्यक्रमात आयुवत गोयल बोलत होते. ‘संविधान'ने आपल्याला बऱ्याच प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे, ते स्वातंत्र्य असले तरी काही बंधने आणि सीमा आपण नागरिक म्हणून पाळल्या पाहिजेत. ‘आणीबाणी'च्या कालावधीत घडलेल्या घटनांवर चर्चा होवून, ‘संविधान'मध्ये काही बदल केले गेले. त्यामुळे संविधान अजुन मजबूत झाले. त्यामुळे आजच्या या ‘आणीबाणी'च्या वर्धापन दिनी, ‘आणीबाणी'च्या काळात ज्यांनी लढा दिला, त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे, असेही आयुवत गोयल पुढे म्हणाले.
यावेळी आचार्य अत्रे रंगमंदिराच्या तळमजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणी विषयक चित्रांच्या प्रदर्शनाचे आणि डिजीटल स्टॅन्डीवरील माहितीपर छायाचित्रांचे उद्घाटन आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
‘आणीबाणी'चा वर्धापन दिन म्हणजे ‘संविधान'बाबतची आस्था, लोकशाहीचा जागर आणि राष्ट्राबाबतचे प्रखर प्रेम दर्शविण्याचा दिवस होय, असे उद्गार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी यावेळी बोलताना काढले.
प्रमुख वक्ते, ‘संविधान'चे अभ्यासक माधव जोशी यांनी ‘संविधान'ने दिलेले हक्क आणि आपली कर्तव्ये याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आणीबाणी'चा कालावधी एक काळा कालखंड आहे, ‘आणीबाणी'च्या लढ्यामध्ये कल्याण-डोंबिवली मधील काही नागरिकांनी देखील हिरीरीने सहभाग घेतला होता. आपली राजवट प्रजासत्ताक राजवट आहे. ‘संविधान'ने दिलेल्या अधिकारामुळे आपण सार्वभौम आहोत. स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे, असे माधव जोशी म्हणाले.
यावेळी ‘संविधान जनजागृती रॅली'मध्ये आयुक्त अभिनव गोयल यांच्या समवेत महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत उत्स्फुर्त सहभाग घेतला.
‘आणीबाणी'च्या ५०व्या वर्धापन दिनी महापालिका क्षेत्रातील शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी केलेल्या मनमोहक, चित्तवेधक देशभक्तीपर नृत्याच्या सादरीकरणाने आणि देशभक्तीपर सुरेल गीत गायनाने तसेच महापालिकेतील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने अत्रे रंगमंदिराचे सभागृह देशप्रेमाने भारुन गेले होते.
याप्रसंगी आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील, उपायुक्त संजय जाधव, उपायुक्त रमेश मिसाळ, समीर भुमकर, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, जगदीश कोरे, रोहिणी लोकरे, शैलेश कुलकर्णी, शैलेश मळेकर, अशोक घोडे व्यासपिठावर उपस्थित होते.