उरण ते ठाणे, सीएसएमटी, पनवेल लोकल सुरु करण्याची मागणी

उरण : उरणला रेल्वे आल्यापासून अनेक नागरिक दळणवळणासाठी लोकल सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर करु लागले आहेत. सर्वात सुरक्षित विश्वसनीय आणि आरामदायी तसेच कमी खर्चाचा आणि कमी वेळेत योग्य स्थळी पोहोचण्याचा उत्तम सुविधा म्हणून नागरिक रेल्वेसेवेकडे पाहत आहेत. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या उरण ते बेलापूर, उरण ते नेरुळ या मार्गावर लोकलच्या फेऱ्या कमी आणि वेळेत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून लोकलच्या फेऱ्या देखील कमी आहेत. त्यामुळे उरण मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच उरण मधून ठाणे, सीएसएमटी, पनवेल या ठिकाणी थेट लोकल सेवा सुरु करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवा सेने यांच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली आहे.

‘सिडको'ने द्रोणागिरी शहर लोकवस्तीसाठी तसेच मालाची आयात-निर्यात करण्यासाठी वखारी, कंटेनर फ्रेंट स्टेशन बसविले आहेत. मुंबईला पर्याय म्हणून ‘सिडको'ने शहर बसविले आहे. द्रोणागिरी नोडपासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे महापालिका क्षेत्र तसेच मुंबई-पुणे हायवे तसेच मुंबई-गोवा हायवे जाडलेले आहे. या विभागात न्हावा शेवा बंदर (जेएनपीए) आहे. येथे ‘जेएनपीए'चे विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) तसेच ओएनजीसी, एमएसईबी, बीपीसीएल, आयओटीएल, आयओसीएल, एमआयडीसी, रिलायन्स, कस्टम हाऊस, जेएनपीए टाऊनशीप कार्यरत आहेत. त्यामुळे येथील असंख्य कंपन्यांमध्ये  लाखो कामगार (माथाडी, ड्रायव्हर, सीएचए, आदि) रोजगारानिमित्त दररोज लोकलने येत असतात. उरणचा इतिहास आणि भूगोल पाहता ‘मध्य रेल्वे'ने उरण-द्रोणागिरीच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी उरण ते सीएसएमटी, उरण ते पनवेल आणि  उरण ते ठाणे लोकल सुरु करावी. सध्यास्थितीत उरणकरांना नेरुळ अथवा बेलापूर रेल्वे स्थानकात उतरुन पुढे मार्गक्रमण करावे लागते. यामध्ये शारीरिक श्रम आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे ‘मध्य रेल्वे'ने उरण ते मुंबई आणि उरण ते पनवेल, ठाणे अशी लोकल सेवा सुरु करुन उरण-द्रोणागिरीवासियांना, चाकरमान्यांना आणि उरणकर प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर, युवासेना उरण तालुका अधिकारी करण हरिश्चंद्र पाटील, विभागप्रमुख रुपेश पाटील यांनी पत्राद्वारेे केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार