एसटी बस रस्त्यालगतच्या भिंतीवर धडकून अपघात
नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील आशिवली येथून पनवेल डेपोच्या दिशेने येणाऱ्या भरधाव एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस रस्त्यालगतच्या भिंतीवर आणि झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात बस मधील १० प्रवासी जखमी झाल्याची घटना पनवेल मधील कोन गांव येथे घडली. या अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी एसटी बस चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील एसटी बस १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पनवेल तालुक्यातील आशिवली येथून पनवेल डेपोकडे येत होती. सदर बसमध्ये ५० प्रवासी होते. बस पनवेल मधील कोन गांव येथील चांदनी बार जवळ आली असताना, बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर तसेच भिंतीवर धडकली.
या अपघातात एसटी बस मधील योगेश थोरात, दौलत कोकीतकर, सॅम सॅमवेल, सलमान शेख, शरद कदम, संजु कनोजीया, हर्ष दुबे, वेदिका दाभणे, पुनम पालंडे, पार्थ शाहु असे १० प्रवासी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील एसटी बस चालकाने हलगर्जीपणे तसेच निष्काळजीपणे बस चालवून नेल्यामुळे सदरचा अपघात घडल्याचे आढळून आल्याने पनवेल तालुका पोलिसांनी एसटी बस चालक योगेश थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
या अपघातातील एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने इतर वाहनांवर धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सदर बाब एसटी बस चालक थोरात याच्या लक्षात आल्यानंतर त्याने बस मधील प्रवाशांना वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या बाजुला नेल्याचे आणि सदर बस रस्त्यालगतच्या भिंतीवर धडकवल्याचे पोलिसांनी सांगितले.