‘सुपर स्वच्छ लीग' कॅटेगरीत नवी मुंबई
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये सातत्याने आपले मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबई शहर नावाजले जाते. ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्येही देशातील द्वितीय क्रमांकाचे (तांत्रिकदृष्ट्या तृतीय) स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेला मानांकन लाभले आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार रेटींग आणि ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च वॉटर प्लस' रेटींग देखील नवी मुंबई महापालिकेने प्राप्त केलेले आहे.
या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'चे टूलकिट प्रकाशित करताना शहरी विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री ना. मनोहरलाल खट्टर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण'करिता आजवरच्या स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या उच्चत्तम शहरांकरिता ‘सुपर स्वच्छ लीग' अशी नवीन विशेष कॅटेगरी निर्माण करीत असल्याची घोषणा केली. यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर शहरांच्या ५ श्रेणी निवडण्यात आल्या. त्यामधील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या देशातील प्रमुख शहरांच्या मुख्य गटात ३ शहरांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये नवी मुंबई महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.
या ‘सुपर स्वच्छ लीग' गटामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरात मधील सुरत या ३ शहरांचा समावेश आहे. या ३ शहरांनी सातत्याने स्वच्छतेमध्ये अग्रक्रम राखला असून त्यांची स्वतंत्र कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने सदर अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून या यशस्वी मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
नवी मुंबईकर नागरिक नेहमीच स्वच्छता कार्यात अग्रेसर राहिले असून येथील स्वच्छतेबाबत वेळोवेळी दाखवलेली जागरुकता शहराच्या नावलौकिकात भर घालणारी राहिली आहे. त्यामुळे ‘सुपर स्वच्छ लीग' या विशेष गटात समावेश झाल्यानंतर अधिक जागरुकतेने स्वच्छता वाढीवर भर देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सुपर लीगमध्ये समावेश झाल्याने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' मध्ये गुणांकनाचे स्वरुप बदलले असून आता १० हजार गुणांचे मूल्यमापन आहे. त्या गुणांच्या वर्गवारीमध्ये प्रत्यक्ष दर्शनी स्वच्छतेला १५०० गुण, घन कचऱ्यावरील शास्त्रोक्त प्रक्रियेकरिता १५०० गुण तसेच जनजागृती उपक्रमांकरिता १५०० गुण असणार आहेत. त्याचप्रमाणे वर्गीकृत कचरा संकलनाकरिता १००० गुण, शौचालय व्यवस्थापना करिता १००० गुण, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्उपयोगाकरिता १००० गुण आणि माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी १००० गुण असणार आहेत. तसेच लोकांकडून प्राप्त तक्रार निवारणासाठी ५०० गुण, मलनिःस्सारण प्रक्रियेकरिता ५०० गुण आणि स्वच्छताकर्मीकरिता कल्याणकारी कामांसाठी ५०० गुण अशाप्रकारे एकूण १०,००० गुणांनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय कचरामुक्त शहर मानांकनाकरिता २५०० गुण आणि ओडीएफ वॉटर प्लस मानांकनासाठी २५०० गुण ग्राह्य धरले जाणार आहे.
या ‘सर्वेक्षण'मध्ये शालेय स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार असून स्वच्छ आणि कचरामुक्त शाळा, शाळांमधील कचरा वर्गीकरण आणि कंपोस्ट पीटस्चा वापर, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व्यवस्था अशा विविध बाबींची बारकाईने पाहणी करण्यात येणार आहे.
नवी मुंबईचा ‘स्वच्छ सर्वेक्षण'मधील ‘सुपर स्वच्छ लीग' या नव्याने निर्माण केलेल्या विशेष गटात समावेश होणे आनंदाची गोष्ट आहेच. त्यासोबतच आपल्या सर्वांची जबाबदारी वाढवणारी बाब आहे. स्वच्छतेमधील नवी मुंबईच्या आजवरच्या मानांकनात नवी मुंबईतील विविध समाज घटकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. दैनंदिन शहर स्वच्छ ठेवणारे स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखी तसेच सफाईमित्र यांचे सव्रााधिक योगदान या मानांकनात आहे. यापुढील काळात शहराचे मानांकन उंचावण्यासाठी अधिक जोमाने काम करुया. असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.