‘एनएमएमटी'च्या जखमी वाहकाला ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ची मदत

प्रशासनाने जखमी कामगारांना कामावर रुजू होईपर्यंत भरपगारी रजा देण्याची मागणी


नवी मुंबई : कर्मचारी जखमी झाल्यावर त्याची विचारपूस करण्याचे सौजन्य प्रशासन, व्यवस्थापन तसेच कोणतीही कर्मचारी संघटना घेत नसतानाच जखमी होवून घरी उपचार घेत असलेल्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील (एनएमएमटी) कर्मचाऱ्याला घरी जावून त्याला आर्थिक मदत करण्यासाठी इंटक संलग्न ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने पुढाकार घेतला आहे. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने सदरची मदत करण्यात आली आहे.

एनएमएमटी सेवेमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणारे वाहक कर्मचारी काशिनाथ त्रिंबक बावस्कर (वाहक क्रमांक ३६८१) मार्गिका क्र.७१ वरील बसमधे वाहक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना नावडे फाटा येथे बसचा टायर फुटून मोठा अपघात झाला. यावेळी बसमध्ये जवळ पास ६० प्रवासी होते. या अपघातात वाहक काशिनाथ बावस्कर जखमी झाले. सदर बसही ठेकेदार सुपर मोबिलिटी कंपनीची होती होती. जखमी वाहक बावस्कर काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते. पायाला गंभीर दुखापत झाल्याने सध्या ते घरी उपचार घेत आहेत. त्यांना अद्यापपर्यंत महापालिकेकडून पगार देखील देण्यात आलेला नाही.  काशिनाथ बावस्कर यांची परिस्थिती नाजूक आणि हलाकीची आहे. २ लहान मुले शाळेत शिकत आहेत, लाईट बिल भरायला देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. तर डॉक्टर कडे जाऊन फी भरायची ऐपत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे कामगार नेते रविंद्र सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण पडघा येथील खडवली गावी जाऊन ‘एनएमएमटी'चे जखमी वाहक बावस्कर यांची भेट घेत त्यांना ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या वतीने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. याप्रसंगी रविंद्र सावंत यांच्या समवेत ‘युनियन'चे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिट अध्यक्ष संजय सुतार, परिवहन विभाग युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, इस्माईल सैयद, गोविंद गायकवाड, नरेश मागडे, बाळु भालेराव, विजू राठोड, जितेश तांडेल, अभिषेक पथया, रतन वैद्य, राजेश शेलारकर, आदि उपस्थित होते.

वास्तविक पाहता महापालिका परिवहन उपक्रमाने जखमी कामगारांना बरे होईपर्यत, कामावर रुजू होईपर्यत भरपगारी रजा दिली पाहिजे. यासाठी गेल्या काही वर्षापासून आम्ही ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या माध्यमातून प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. -रविंद्र सावंत, अध्यक्ष-महाराष्ट्र कर्मचारी युनियन.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण तालुका मनसेच्या वतीन महामार्गावरील खड्ड्यांत कमळाची फुले वाहून अनोळख्या पध्दतीने आंदोलन