‘आप'तर्फे दिघा विभाग कार्यालयावर मोर्चा

प्रलंबित नागरी समस्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा निषेध

नवी मुंबई : ‘आम आदमी पार्टी'चे नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे दिघा विभागातील नागरी समस्या निवारण्यासाठी महापालिकेच्या दिघा-एच विभाग कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पण, दिघा विभाग कार्यालयाकडून त्याबाबत काहीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे दिघा विभागातील प्रलंबित नागरी समस्यांसाठी ‘आप-नवी मुंबई'च्या वतीने दिघा विभाग कार्यालयात शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संतोष केदारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या सदर मोर्चामध्ये युवकांची आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

दिघा विभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या शाळांची परिस्थितीत अत्यंत गंभीर आहे. व्यावसायिक गाळ्यांमध्ध्ये शाळा भरविल्या जात असून, तेथे पावसाची गळती आणि वायुविजनच्या गंभीर समस्या आहेत. त्याबद्दल महापालिका प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. दिघा विभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था, मैदाने आणि रिक्षा स्टॅन्ड जवळ नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे बनविण्यात यावीत. दिघा विभागातील चाळींच्या दिवाबत्तीची व्यवस्था नसल्याने गुन्हेगारी कारवाया सातत्याने होत आहेत. त्यामुळे बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरु करुन आवश्यक ठिकाणी नवीन पोलची व्यवस्था तातडीने करावी. विष्णू नगर, रामजी नगर येथील काही भाग डोंगरालगत असल्याने तेथे संरक्षण भिंत उभारणे. दिघा विभाग कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकाच्या मार्गदर्शनासाठी कुठलेही बोर्ड लावलेले नसून महापालिका राबवत असलेल्या योजनांचे माहिती फलक दर्शनी भागात लावण्यात आलेले नाहीत. यासह इतर नागरी समस्यांबाबत विभाग कार्यालय, महापालिका प्रशासनाकडे देखील पत्रव्यवहार, पाठपुरावा करुन देखील संबंधितांकडून काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ ‘आप'च्या वतीने दिघा विभाग कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संतोष केदारे यांनी सांगितले.

सदर मोर्चात ‘आप'चे तुर्भे वॉर्ड अध्यक्ष सोहेल शेख, विनोद इंगळे, मोहन चोरमले, युवराज खरात,  मिलिंद सावंत, मिथुन घंटेवाड, वॉर्ड क्र.३ चे अध्यक्ष अरविंद गुप्ता, रेश्मा जाधव, सुमन घंटावाड, राणी खरात, चांगुणा मोरे, मीना चौधरी, आदि पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

नवी मुंबई महापालिका मध्ये प्रशासकीय राजवटी आहे. लोकप्रतिनिधींअभावी, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने ते जाणूनबुजून नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. येत्या काळात सदर समस्यांचे निराकरण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. - संतोष केदारे, युवा अध्यक्ष- आप नवी मुंबई.

वॉर्ड ऑफिस तसेच महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन आणि सतत पाठपुरावा करुन सुध्दा नागरी समस्यांचे निराकरण होत नाही. सदर बाब नवी मुंबईसारख्या शहरासाठी भूषणावह योग्य नाही. - देवराम सूर्यवंशी, निवृत्त कामगार आयुक्त तथा अध्यक्ष -ऐरोली विधानसभा क्षेत्र, आप.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेलमध्ये गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात