अपरिचित शिवराय लेखमाला

छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभा जीवन पट बघितला, अभ्यास केला असता आपणास विचार करण्यास प्रवृत्त होऊन, निवृत्त होत आलोय तरी जीवन प्रवाहात नियुक्त झालोय मात्र संयुक्त असे कार्य आपणाकडून अद्याप करणे बाकी आहे हे जाणवते. महाराज यांचा शिवबा, शिवराय, शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हा जो काही प्रवास, सहवास आहे तो एक तरुणाईसाठी जीवन झंझावातसारखा वादळ वारा होऊन, करून काय केलं तर जीवनाची रुजवात ही सांजवात होईपर्यंत...लोकांसाठी वहिवाट बनावी असा, सत्य कयास आणि आयाम असला पाहिजे.

   महाराज यांच्या जीवनातील कालानुक्रमे काही घटना आणि वय बघता आपण खुप अचंबित होतो, म्हणजेच शिवबा यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० आली शिवनेरी येथे झाल्यानंतर ते वयाच्या सहाव्या वर्षी ऑक्टोबर १६३० मध्ये विजापुरास जातात आणि १६४२मध्ये म्हणजे १२ व्या वर्षी पुण्यात परत येतात. ६ वर्ष वय ते १२ वर्ष या सहा वर्षात शिवबा शिवराय बनावे इतकं महा प्रचंड सैनिकी प्रशिक्षण घेऊन पुण्यात १२ व्या वर्षात पाऊल ठेवतात आणि हेच शिवबा वयाच्या १५ व्या वर्षी १६४५ मध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना शप्पथ रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन घेतात तेव्हा आपण म्हणू शकतो, मुलाचे पाय पाळण्यात आणि पळण्यात दिसतात. १९ ऑक्टोंबर १६४७ मध्ये अफाट असा पुरंदर किल्ला आदिलशहाकडून खुल्या मैदानात महाराज जिंकून घेतात, तेव्हा त्यांचं वय आहे फक्त सतरा वर्ष! या वयात आम्ही हयात आहोत की नाही, याचा देखील पुरावा नसतो.

  १० मार्च १६४९ साली, स्वराज्य संकल्पक श्री शाहजी महाराज यांना विजापूर दरबारी अटक होते, तेव्हा शिवबा नुकतेच १८वर्ष वयाचे आहेत आणि त्याच वयात शिवबाने आपल्या वडिलांना दिल्ली दरबारात राजकारण करत, कूटनीती वापरत, १६मे १६४९ मध्ये पुण्याहून सूत्र हलवत मुक्त करतात. १५जानेवारी १६५६ मध्ये महाराज जावळी काबीज करतात, तेव्हा ते ऐन तारुण्यात पदार्पण करत वय वर्ष २५ पूर्ण करत असतात आणि १४ मे १६५७ ला, महाराज यांच्या वयाच्या २६ मध्ये पुरंदरावर संभाजी महाराज यांचा जन्म झाल्यावर १० नोव्हेंबर १६५९ ला ते अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून, राजगडावर मातोश्री आईस मुंडके अर्पण करून आपला बंधू संभाजराजे यांचा कनकगिरी येथे अफजलने घातपात करून केलेल्या हत्यांचा आणि शाहजी महाराज यांना विजापुरास अटक करणाऱ्या हैवान याचा बदला घेतात, तेव्हां महाराज यांचे वय आहे फक्त २८ वर्ष पूर्ण! खूप थक्क करणारा हा शिव प्रवास आहे. ५ एप्रिल १६६३ मध्ये, आपल्या वयाच्या ३२ व्या वर्षात शाहिस्तेखान यास अद्दल घडवायची संधी साधून बोटे कलम करत...त्यास बंगाल प्रांतात तडीपार करण्यास औरंगजेब बादशहा मजबूर करतात. वयाच्या ३३ साली ६ जानेवारी १६६४ मध्ये सुरतेवर स्वारी करून स्वराज्य धन प्राप्त करतात, २३ जानेवारी १६६४ मध्ये शाहजी राजे यांचे कर्नाटकात होदिगरे येथे घोड्यावर शिकार करण्यात निधन होते तेव्हा, महाराज हे दुःख पचवत २५ नोव्हेंबर १६६४ ला, किल्ले सिंधुदुर्ग मुहूर्त साधून घेतात. हे सारे त्यांचं वय ३३ असताना होते.

         ३ मार्च १६६५ मध्ये मिर्झा राजे जयसिंग हा  पुण्यास येतो आणि ५ मार्च १६६५ ला शिवराय यांना पुरंदर तहानुसार वयाच्या ३५ मध्ये आग्रा दरबारात निघावे लागते. तिथे अडकल्यानंतर औरंगजेब बादशहा याच्या हातावर तुरी देऊन महाराज १७ ऑगस्ट १६६६ मध्ये पसार होतात आणि २० नोव्हेंबर १६६६ मध्ये राजगडावर पोहोचल्यावर,आपण काय आहोत हे महाराज सिध्द करून प्रसिद्ध होतात. १६६९ च्या ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्‌वस्त केल्यावर, महाराज उद्विग्न होतात आणि आपल्या वयाच्या ४० व्या वर्षी तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वात ४ फेब्रुवारी १६७० मध्ये कोंढाणा किल्ला काबीज करतात, याच वर्षी महाराज यांना याच किल्यावर २४ फेब्रुवारी १६७० मध्ये राजाराम महाराज हे दुसरे पुत्र जन्म लाभ होतो तसेच ४ ऑक्टोंबर १६७० मध्ये दुसऱ्यांदा सुरतवर चाल करतात. महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात हा दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न होतो, तेव्हा महाराज हे वय वर्ष ४४ मध्ये पदार्पण करत आहेत, ही मोठी गोड गोष्ट घडते.

         मात्र १७ जून १६७४ मध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांचे स्वर्गवास झाल्यावर, त्या पुढील वर्षी ४ फेब्रुवारी १६७५ साली महाराज यांची मुंज होते आणि १७ एप्रिल १६७५ साली मावळे प्रसिद्ध फोंडा किल्ला काबीज करतात, तेव्हा ते वयाची ४५ वर्ष साजरे करीत असतात.१९ जून १६७६ नेताजी पालकर यांचे हिंदू धर्मात प्रवेश सोहळा, ६ ऑक्टोंबर १६७६ मध्ये महाराज दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतात, तेव्हा ४६ वय ते पार करत, १३ मे १६७७ साली जिंजी किल्ला काबीज करण्याची ताकद सिध्द करत, याच वर्षी जुलै महिन्यात बंधू व्यंकोजी राजे यांची भेट घेतात. एकूणच दक्षिणेतील काम आटोपून महाराज १६७८ साली रायगडवर परत येतात, वेलोर जिंकतात; मात्र याचं वर्षात संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाल्याने ४८ व्या वर्षी खचत असल्याची भावना होते. मात्र १४ जानेवारी १६८० मध्ये संभाजी महाराज हे परत येतात, ७ मार्च १६८० रोजी राजाराम महाराज यांची मुंज होते, १५ मार्च १६८० रोजी राजाराम महाराज यांचा विवाह संपन्न होतो, आणि वय वर्ष ५० मध्ये, हनुमान जयंती रोजी ३ एप्रिल रोजी १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानिर्वाण होते.

     एकूणच या लेखात आपण वय आणि काम, कर्तृत्व यांचा विचार करून, आपल्या जीवनासाठी दिशा घेऊन..शिवराय सम व्हावें, बनावे, जगावं हाच संदेश आहे.
- प्रा. रविंद्र पाटील (शिवव्याख्याता) 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

‘डायरी या' ची साथ