‘डायरी या' ची साथ

अनेकांना मिळालेल्या डायरीत शेवटच्या पानावर दोन-चार दूरध्वनी क्रमांक, सांगणाऱ्याला बरं वाटावं म्हणून, त्याच्यासमोर लिहून ठेवलेले असतात;  बाकी डायरीची सगळीची सगळी पानं कोरी ठक्क. अशा अगणित डायऱ्या, घराघरात ,कार्यालयात, ड्रायव्हरच्या खणात बेवारशासारख्या, ‘व्हर्जिन' पडून राहतात, तरी माणसं दरवर्षी हावरटपणे नवीन डाय-या मिळवण्यासाठी धडपडतात का? वर्षवर्ष माणसं, चार ओळीचं साधं पोस्ट कार्ड कोणाला लिहून पाठवीत नाहीत. पण दोनदोन तीनतीन मोठमोठ्या डाय-या मात्र, घरात आणून अक्षरशः कुजवतात. हा कोट्यावधी रुपयाच्या राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस कशासाठी ?

 आपला देश पहिल्यापासूनच महान आहे.कारण आपला देश विविधतेने नटलेला असून देशात इतके धर्म, इतक्या जाती- जमाती आहेत आणि त्यांचे सण, रितीरवाज इतके विविध प्रकारचे आहेत की, या देशात पूर्ण वर्षभर सतत काही ना काही सण-समारंभ सुरूच असतात आणि त्यातून जो काही थोडाफार वेळ शिल्लक राहतो त्यात, या महान देशातील महान माणसं, देशभक्तीपोटी काही धंदा उद्योग, नोकरीच्या माध्यमातून देशभारणीसाठी खपत असतात.

       आपला देश संस्कृती प्रधान वगैरे असल्याने देशात सर्वत्र सदासर्वदा काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात. आपल्याला लाभलेल्या महान सांस्कृतिक वारशानुसार आपण आपले धार्मिक सण, राष्ट्रीय उत्सव अगदी उत्स्फूर्तपणे साजरे करत असतो. त्यात अगदी तन-मन-धनाने सहभागी होत असतो आणि त्याचा आम्ही सार्थ अभिमानही बाळगून असतो.

       जेव्हा आपण आपला देश विविधतेने नटलेला आहे असे म्हणतो तेव्हा असं नुसतं म्हणून चालेल काय ? तर ते सप्रमाण सिद्धही करावं लागतं.

        आता आमच्या विविध सणांचाच उदाहरण घेऊ या ! आमचे सण आमच्या ऋतुनुसार येतात. त्या त्या ऋतूमध्ये, ते ते सण साजरे करण्यात देशातली त्या त्या वेळची परिस्थिती इतकी अनुकूल असते की; आमचे सण साजरे करण्यास आम्हाला काहीच प्रयास पडत नाहीत. नुसते सणांचेच काय, आमच्या देशात आजारपणं, रोगांच्या साथीसुद्धा ऋतूनुसारच येतात. म्हणजे असं की, पावसाळा सुरू झाला की आमच्याकडे थंडी ताप, हगवण अशी खास देशी आजारांची किंवा रोगांची साथ सुरू होते. हिवाळा सुरू झाला की सर्दी, पडसं अशा देशी तर मलेरिया सारख्या विदेशी आजारांची साथ येते. अशा मोसमानुसार विविध रोगांच्या विवीध साथी सणावाराप्रमाणेच आपल्याकडे सदासर्वदा सुरू असतात. पण या साथींची कधी शहरी भागात तीव्रता जास्त असते तर कधी ग्रामीण भागात जास्त असते. त्यामुळे शहरी व ग्रामीण समाज जीवनाचे संतुलन साधण्यासाठीही मदत होते. इतक्या विविध दुखण्याच्या साथी सदासर्वदा सुरूच असल्याने, देशात डॉक्टर लोकांची नितांत गरज पडते आणि ‘गरजवंताला अक्कल नसते' या उक्तीनुसार भारतातील बहुतांशी मातापित्यांना आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टरच व्हावं अशी स्वप्नं पडण्याची एक वेगळीच साथ सुरू झालेली आहे.

 ठराविक मोसमात ठराविक रोगांची साथ येते, या नियमाला कधीकधी अपवाद होतो. मात्र वर्षातील डिसेंबर महिन्याच्या शेवटीशेवटी व जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला एका रोगाची साथ मात्र हमखास येतेच आणि तो रोग म्हणजे ‘डायरि'या.

         डायरिया या रोगाची साथ मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात येते, कारण शहरी भागात शिक्षीत म्हणजेच लिहिण्य वाचणा-यांची संख्या जास्त असते. डिसेंबरच्या दुसऱ्याआठवड्यात, विविध कंपन्या ऑफिसमधील फोन खणखणू लागतात.  नमस्कार साहेब...मी अमुक अमुक बोलतोय
हा बोला.

काय नाय, सहजच फोन केला... तब्बेतपाणी ठीक आहे ना?
 हो...हो, अगदी झकास.
 साहेब, फोन अशासाठी केला होता.., दरवर्षीप्रमाणे आपली एक डायरी हवी. विसरू नका म्हटलं!

        जाहिरातीचा भाग म्हणून, बऱ्याचशा कंपन्या, संस्था आपल्या ग्राहकांना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाय-या छापायला देतात. पॉकेट डायरी, टेलिफोन डायरी पासून अगदी थेट एक्झिक्युटिव्ह डायरीपर्यंत छपाईचं काम सुरू होतं. छापखान्यातून डाय-यांचे  गठ्ठे कार्यालयात दाखल होतात आणि दरम्यान डिसेंबर महिना संपतो. नव्या वर्षाच्या शुभेच्छाबरोबर नव्या कोऱ्या, सोनेरी कोपऱ्याच्या गर्भरेशमी डायऱ्या एकमेकांना दिल्या जातात. साधारणतः जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ‘डायरियाची' साथ जोरात पसरते.

         जिकडे तिकडे डाय-याच डाय-या दिसायला लागतात. संध्याकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांच्या बॅगेत, हातात नव्या को-या डाय-या दिसतात. इतकेच काय तर, सरकारी कार्यालयात, मंत्रालयात तर, डायरीचा गठ्ठा  हातात नसेल तर..,प्रवेश मिळणे मुश्किल होतं !

       माणसं नव्या कोऱ्या डायऱ्या मनोभावे, जपून घरी आणतात. एका डायरीत, एक अख्खं वर्ष बंदिस्त झालेले पाहून, पुढचं पूर्ण वर्षच आपल्या हातात असल्याचा त्याला आनंद होतो, अभिमानही वाटतो. नववर्षाकडून प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतातच. रेंगाळलेल्या, राहून गेलेल्या स्वप्नांचे, स्वप्नपूर्तीचे संकल्प असतातच. संकल्प पूर्तीसाठी योजनाबद्ध कार्यक्रमही आखायचे असतात आणि आखलेले कार्यक्रम सिद्धीस जाण्यासाठी ते नीट कालानुक्रमे, बिनचूक, कामे वेळच्या वेळी होण्यासाठी, आवश्यक असते..डायरी !

      डायऱ्या देणाऱ्याच्या हेतूबद्दल शंका घ्यायला जागा नसते आणि असतेही! डाय-या देण्याचा उदात्त उद्देश कंपनीच्या मालाची, सेवेची जाहिरात करणे हा तर असतोच, मात्र जितक्या जास्त डाय-या छापल्या जातील, त्याचे बिल जितकं जास्त होईल, तितकं कमिशन जास्त ह ही एक उप (युक्त ) हेतू  त्यामध्ये असतोच असतो. अर्ध-अधिक वर्ष संपत आलं, डाय-या वाटून वाटून कर्मचारी दमले तरी, डाय-यांचे ढीग संंपेनात म्हणून शेवटी संचालक स्वतः रस्त्यावर उतरले. भर चौकात उभं राहून, आल्या-गेलेल्यांना आग्रहपूर्वक डाय-या वाटप करतांना दिसले तरी, नवल वाटू नये.

        डायरा देणाऱ्याचा हेतू काहिही असला तरी,  डाय-या घेणाऱ्याचा हेतू, स्वच्छ कोरा करकरीतच असतो. नव्या कोऱ्या, मउसूत डायरीवरून हलकेच हात फिरवून, पहिले पान उघडले जाते. वैयक्तिक माहितीच्या छापील पानावरील रिकाम्या जागा खुणवायला लागतात. चांगलेसे पेन घेऊन, परमेश्वराचे स्मरण करून डायरी लेखनाचा शुभारंभ सुरू होतो.

     नाव..पत्ता..जन्मतारीख..वय..शिक्षण...नोकरी.. धंदा..टेलीफोन नंबर, इतकं सारं अतिउत्साहाने, एका दमात लिहून होतं आणि लिखाणाला कर्कचून ब्रेक लागतो. इन्कम नंबर, ड्रायव्हिंग लायसन नंबर, डायनर्स कार्ड नंबर, पासपोर्ट इत्यादी...पुढचं वाचवतच नाही. पेन पुढे चालतच नाही. डायरी लिखाणाचा आरंभ आणि शेवटही इतकाच!  डायरी अलगद टेबलाच्या ड्रॉवरमध्ये सरकवली जाते. रोजच्या जगण्याच्या अनंंत व्यापामध्ये माणसं डायरीला विसरून जातात. दिवस, महिने सरत जातात...ड्रॉवरमधली डायरी जुनी, शिळी होत जाते. मात्र, एखादी टुकीनं संसार चालवणारी ग्रहिणी नित्यनेमाने धान्याचा, भाजीचा, तेलाचा, गॅसचा ,पोरांच्या फीचा असा संसाराचा हिशेब बिनचूकपणे डायरीत लिहीत रहाते आणि संसाराचा ताळेबंद जुळविण्याचा केविलवाणा प्रयास करत रहाते.

        मुळात मोठी,  महत्वकांक्षी माणसं, म्हणे नियमित रोजनिशी म्हणजे डायरी लिहितात आणि नियमित डायरी लिहितात म्हणूनच ती तेवढी मोठी होतात. जगातल्या जवळजवळ सर्वच ख्यातनाम नेत्यांनी तुरुंगात किंवा फावल्या वेळात लिहिलेल्या रोजनिशीतील मजकूर यथावकाश पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्यावर त्या नेत्याच्या कर्तुत्वावर आणखी वेगळा प्रकाश पडल्याचे बऱ्याच वेळा घडले आहे. काही काही सुप्रसिद्ध व्यक्तींच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या रोजनिशितील मजकुरामुळे, त्या व्यक्तीच्या जीवनातील काही रहस्य, अकस्मितरित्या समाजापुढे येऊन, त्या व्यक्तीची समाजमनापुढे असलेली प्रतिमा बदलण्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. काही जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या डायरीतील नोंदवलेल्या शोधाचे रहस्य मिळवण्यासाठी, कायकाय खटाटोप करावे लागले, कोणत्याकोणत्या दिव्यातून जावे लागले इत्यादी तपशीलवार चित्रण करणारे चित्रपट आपण पाहिलेले असतात. एकूण काय तर, नियमितपणे डायरी लिहिणारे खरोखरच महान असतात ! आणि आपणही महान व्हावं म्हणून, माणसं जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त डाय-या मिळवण्यासाठी किती तरी खटाटोप करतात. पण, आपला देश महान असला तरी, देशातल्या सर्वच माणसांना महान होता येत नाही, त्याला कोण काय करणार?

           जगण्याच्या दबडग्यात दिवस, महिने सरत जातात. पुन्हा नव्या वर्षाचा डिसेंबर महिना येतो. पुन्हा नवीन डायरी मिळते. नवी डायरी आल्यावर टेबलाच्या ड्रायव्हरमधली जुनी, गतवर्षीची डायरी बाहेर येते. पहिल्या पानावरील अर्ध्या गाळलेल्या जागा तेवढ्याच भरलेल्या. शेवटच्या पानावर दोन-चार दूरध्वनी क्रमांक, सांगणाऱ्याला बरं वाटावं म्हणून, त्याच्यासमोर लिहून ठेवलेले. बाकी डायरीची सगळीची सगळी पानं  कोरी ठक्क. अशा अगणित डायऱ्या, घराघरात ,कार्यालयात, ड्रायव्हरच्या खणात बेवारशासारख्या, ‘व्हर्जिन' पडून राहतात, तरी माणसं दरवर्षी हावरटपणे नवीन डाय-या मिळवण्यासाठी धडपडतात का? वर्षे वर्ष माणसं, चार ओळीचं साधं पोस्ट कार्ड कोणाला लिहून पाठवीत नाहीत. पण दोनदोन तीनतीन मोठमोठ्या डाय-या मात्र, घरात आणून अक्षरशः कुजवतात. हा कोट्यावधी रुपयाच्या राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस कशासाठी ? हे कोणाला विचारायचीही सोय नाही!

       आमचा जेष्ठ कविमित्र, सायमन मार्टीनची,
ही इवलीशी कविता किती काही सांगून जाते;
   डायरी
  वर्ष संपलं
  कोरीच आहेत
  कित्येक पानं
  आयुष्यासारखी...
  तरीही संपत नाही
  डायरी जमविण्याचा सोस.
नव्या वर्षाची नवी डायरी आल्यावर, सरत्या वर्षाची जुनी डायरी, पोरासोरांना अभ्यास करायला, गणितं सोडवायला बहाल केली जाते आणि महानगरातील एकूण एक लहान बालकं त्या जुन्या डायरीच्या पानापानावर, कधीही न पाहिलेल्या सूर्योदयाचा देखावा सप्तरंगी रंगात रंगवतात.

   कदाचित म्हणूनच, अजूनही, रोज, न चुकता सूर्योदय होत असावा !
  अजून फुलती फुले सकाळी
    दिवस उगवतो ठरल्या वेळी,

-साहेबराव ठाणगे   मो. ९८२००९३८६७ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 दैवी शक्ती