कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या मूर्ती कचऱ्याच्या गाडीत

भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे एकत्रित संकलन करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मिरा-रोडच्या शिवार गार्डनजवळ केंद्र उभारले आहे. शहरातील कृत्रिम तलावातून केंद्रावर मूर्ती आणण्यासाठी महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीचा वापर करुन त्यातून मूर्ती नेल्या जात असल्याने गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेने ६ फुटांखालील गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा निर्णय घेऊन शहरात ३५ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. परंतु, त्यात अनेक गैरसोयी असल्याने दीड दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी काही ठिकाणी विरोध झाला होता. त्यावरून मोठा वादंग होऊन ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, त्यात प्रशासनाने सुधारणा केली नाही. २ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती विसर्जन करण्यासाठी सर्व तलावावर मूर्ती येत होत्या. तेथे गणेश भक्ताना संताप आणणारी दृश्य पहायला मिळत होती.

काशिमिरा येथील जरीमरी तलावाजवळ उभारलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या मूर्तीची दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या कचऱ्याच्या गाडीतून वाहतूक केली जात होती. असाच प्रकार अनेक कृत्रिम तलावाजवळ दिसत असल्याची तक्रार अनेक गणेशभक्तांनी केली आहे. जरीमरी येथील नैसर्गिक तलावाजवळ असलेल्या कृत्रिम तलावात गेल्या ७ दिवसात मोठ्या संख्येने गणेशमूर्तीचे विसर्जन झाले  आहे. विसर्जन झाल्यावर लगेचच कर्मचारी मूर्ती बाहेर काढून ठेवत होते. तरी देखील कृत्रिम तलावात आणि आजुबाजुला पीओपीचा गाळ साठला गेला. सदर गाळ स्वच्छ करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यावर पाण्याचा मारा करुन तो नैसर्गिक तलावात टाकला. त्यामुळे नैसर्गिक तलाव दुषित झाल्याची बाब समोर आली आहे. न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या ३१ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता या कर्मचाऱ्यांवर सुध्दा गुन्हे दाखल करा, अशी मागणी गणेशभक्त करीत आहेत.

विसर्जित गणेशमूर्तीच्या वाहतुकीचे नियोजन करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. मात्र, कचऱ्याच्या वाहनातून गणेश मूर्तींची केली जात असल्यास त्याबाबत माहिती घेऊन उचित कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आंदोलनादरम्यान उरलेली अन्नधान्याची रसद इतर कार्यासाठी वापरणार