‘माझी माती माझा देश' अभियान

शहीद-वीरांचा नामोल्लेख असणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण, पंचप्राण शपथ, ७५ वृक्षरोपांची लागवड

नवी मुंबई : स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या आणि वीर सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश' अर्थात ‘मेरी माटी मेरा देश' असे राष्ट्रव्यापी अभियान जाहीर करण्यात आले आहे. यानिमित्त देशभरात प्रत्येक गावशहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वीरांना अभिवादन केले जात असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत शासन निर्देशानुसार ९ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत शासन स्तरावरुन वेबसंवादाद्वारे झालेल्या विशेष बैठकीत कार्यक्रम आयोजनाविषयी देण्यात आलेल्या सुचनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उद्या ९ ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश' अभियानाच्या विशेष कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले.

सदर बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता  संजय देसाई, ‘अभियान'च्या नोडल अधिकारी तथा क्रीडा विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, समाज विकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत ‘मिट्टी को नमन, वीराें को वंदन' या संकल्पनेनुसार शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक बसविला जाणार आहे. त्याचप्रमाणे मातीचे दिवे अथवा माती हातात घेऊन सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. याशिवाय ‘स्वातंत्र्याच्या अमृत महात्सव'चे औचित्य साधून ‘वसुधा वंदन' अर्थात ७५ देशी वृक्षरोपांची लागवड करुन ‘अमृत वाटिका' तयार केली जाणार असून राष्ट्रध्वजारोहण आणि राष्ट्रगान संपन्न होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश' विशेष कार्यक्रमाचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता नेरुळ, सेक्टर-२६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या नवी मुबईतील आयकॉनिक ठिकाणी करण्यात आले आहे.

‘मेरी माटी मेरा देश' अभियानाच्या https://merimattimeradesh.gov.in या वेबसाईटवर नागरिकांनी शपथ ग्रहण करतानाचा आपला सेल्फी किंवा छायाचित्र अपलोड करावयाचे असून राष्ट्रीय पातळीवर आपले छायाचित्र झळकवित ‘अभियान'मध्ये सहभाग नोंदवावयाचा आहे. या उपक्रमातही जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याबाबत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.     

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा' फडकविण्याचे आवाहन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा' मोहीम राबविली जात असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रप्रेम व्यक्त करावयाचे आहे. त्यानुसार बैठकीमध्ये चर्चा होऊन नागरिकांना झेंडा फडकविण्याचे आवाहन करण्याप्रमाणेच त्यांना झेंडे उपलब्ध होतील अशा जागांची माहिती प्रसारित करण्याविषयी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने नागरिकांना तिरंगा झेंडे नागरिकांना योग्य दरात खरेदी करता येऊ शकतील, अशी केंद्रे सुरु करण्याबाबतचे नियोजन करण्याविषयी आयुक्त नार्वेकर यांनी निर्देश दिले.

आपल्या भारत देशाप्रती मनात असलेला अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी ‘माझी माती माझा देश' अंतर्गंत ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नेरुळ, सेक्टर-२६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटनस्थळी आबालवृध्द नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘शिवसेना'तर्फे सीवुडस्‌ मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव