संभाजी भिंडेंना तडीपार करण्यासाठी नेरूळ कॉंग्रेसची निदर्शने
नेरूळ पोलिस स्टेशनसमोर कॉंग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी
नवी मुंबई : महात्मा गांधीबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेना अटक करून त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे यासाठी नेरूळ पोलिस स्टेशनसमोर नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसतर्फे कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व त्यानंतर नेरुळ पोलिस ठाण्यात जावून संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून तडीपार करावे, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात रविंद्र सावंत म्हणाले की, संभाजी भिडे यांनी २४ जुलै रोजी अमरावतीत एका जाहिर कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी लज्जास्पद व अपमानजनक वक्तव्य केले आहे. ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमे आझादी बिना खडंग बिना ढाल’ ही गाणी बोलत तसेच कानावर पडत आमची पिढी तसेच आमच्या मागची पिढी लहानाची मोठी झाली व आताच्या पिढीलाही ही गाणी परिचित आहेत. यातूनच गांधीजींची राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्य चळवळीतील योगदान स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानकारक वक्तव्य करून सहा दिवसांचा कालावधी लोटला तरी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झालेला नाही व त्यांना अद्यापि अटकही करण्यात आलेली नाही. भिडेंवर कारवाई नाही, अटक नाही याचाच अर्थ भिडेंच्या वक्तव्याचे पोलिसांकडून समर्थंन तर केले जात नाही ना? भिडेंच्या वक्तव्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. भिंडेच्या राष्ट्रपित्याबद्दलच्या वक्तव्याकडे आज कानाडोळा झाल्यास उद्या कोणीही उठेल राष्ट्रपुरूषाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्याचे धाडस दाखवेल. भिडेंना शासन होणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. यामुळे जनसामान्यांमध्ये प्रक्षोभाचे वातावरण असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीविषयी अपमानास्पद वक्तव्य निर्माण करून समाजजीवनात वाद निर्माण करण्याचा तसेच समाजजीवनात दुही निर्माण करण्याची भिडे यांची नियोजित खेळी आहे. षडयंत्र आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भिडेंना अटक करून त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी निवेदनातून केली. यावेळी नेरूळ पोलिस स्टेशनसमोर कॉंग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नेरुळ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निवेदन देताना रविंद्र सावंत यांच्यासह नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या ताई भांडेकर, कॉंग्रसेच्या माजी नगरसेविका मिरा पाटील, कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष सुतार, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष एस. कुमार, सारसोळे व नेरूळ सेक्टर सहाचे कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे, जुईनगर कॉंग्रेसचे विभाग अध्यक्ष महानंद रामराजे, सचिव विजय कुरकुठे, सचिव विनायक तळेकर, नेरूळ ब्लॉक काँग्रेस, उपाध्यक्ष दिनेश गवळी, प्रल्हाद गायकवाड , सुधीर पांचाळ, नाका कामगार इंटक नेरूळचे अध्यक्ष दिनेश गव्हाणे उपस्थित होते.