वाशीत ‘आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन'चे आयोजन, ४३ देशांतील २१९ फोटोग्राफर्स सहभागी

नवीन कलाकृती निर्माण करण्याची हिंमत आमच्यात - उध्दव ठाकरे

नवी मुंबई :  फोटोग्राफी एक कला असून ती कला ही रक्तात असावी लागते. आपण कलाकृती विकत घेऊ शकतो; पण कला विकत घेऊ शकत नाही. आमच्याकडील काही कलाकृती काही जणांनी विकत घेतल्या, मात्र कलाकार जागेवर असल्याने आम्हाला कलाकृती विकत घेण्याचा प्रश्नच पडला नाही. नवीन कलाकृती निर्माण करण्याची हिंमत आमच्यात आहे, असा टोला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गद्दारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना लगावला.

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमानाने वाशी, सेक्टर-३० मधील ‘भारतीय विद्या भवन'च्या केंद्रात २१ व्या ‘आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन'चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ‘आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन'चे उद्‌घाटन २९ जुलै रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात ४३ देशांमधील २१९ छायाचित्रकारांनी टिपलेली निवडक ७६ छायाचित्र ठेवण्यात आली आहे. या छायाचित्रांची निवड २,३०० छायाचित्रांमधून करण्यात आली आहे.

माझा उल्लेख या ठिकाणी माजी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला. मी जरी माजी मुख्यमंत्री असलो तरी माजी फोटोग्राफर कधीच होणार नाही. कलेचा वारसा मला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाला आहे. आज या ठिकाणी आल्यामुळे मला बऱ्याच दिवसातून माहेरची माणसे भेटल्यासारखी वाटतात. सध्या जे काय चालले आहे, ते मोठे विपरीत आहे. कोणाचा फोटो कोणाबरोबर कधी येईल आणि फोटोमधील एखादा माणूस कधी गायब होईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे थोडा काळ मी फोटोग्राफी थांबवली आहे, अशीही कोपरखळी उध्दव ठाकरे यांनी यावेळी मारली.

याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, चित्रपट दिग्दर्शक संदीप पाटील, ‘फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया'चे चेअरमन एम. एन. रामचंद्रन, अध्यक्ष अनंद निरगुडे,  सुनिल व्यास, राजेंद्र वाघमारे, शशांक नरसाळे, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, आदि उपस्थित होते.

‘फोटोग्राफी'मध्ये क्षण गोठवून ठेवण्याची ताकद...
क्षण जात असतात. आनेवाला कल जानेवाला है, पण हाच कल गोठवून ठेवण्याची ताकद ‘फोटोग्राफी'मध्ये आहे. ‘फोटोग्राफी'च्या माध्यमातून सदर क्षण आपण पाहिजे तेव्हा जिवंत करु शकतो आणि त्या काळात जाऊ शकतो. त्या काळात जे लोक असतील त्यांना आठवणीतून भेटू शकतो. सदरची कमाल फक्त ‘फोटोग्राफी'चीच आहे, असेही उध्दव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जगभरातील छायाचित्रकारांचा समावेश, गौरवास्पद बाब...
फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘पीएसआय'ने घेतलेल्या स्पर्धेत जगभरातील छायाचित्रकार सहभागी झाले आहेत. म्हणजेच फोटोग्राफी देशांच्या सीमारेषा पार करून पुढे गेली असून सदर बाब गौरवास्पद आहे. सदर प्रदर्शनात यापुढे माझे दोन छायाचित्र दिसणार आहेत, तो माझा बहुमान आहे, असेही गौरवोदगार उध्दव ठाकरे यांनी यावेळी काढले.

उध्दव ठाकरे यांना मानद सदस्यत्व बहाल...
‘फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया'च्या वतीने उध्दव ठाकरे यांना मानद सदस्यत्व देऊन गौरवण्यात आले. सदर गौरव ‘सोसायटी'चे चेअरमन एम. एन. रामचंद्रन यांच्या हस्ते करण्यात आला. छायाचित्र प्रदर्शनात ठेवलेल्या सर्वच छायाचित्रांचे उध्दव ठाकरे यांनी बारकाईने निरीक्षण केले आणि सदर छायाचित्र कुठे टिपले याबाबत माहिती करुन घेतली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

संभाजी भिंडेंना तडीपार करण्यासाठी नेरूळ कॉंग्रेसची निदर्शने