१४ गावांचा नवी मुंबई मध्ये समावेशाची अंतरिम अधिसूचना लवकरच

विकास कामांसाठी १४० कोटी निधी जाहीर

वाशी : कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका मध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. याबत अंतरिम अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी, याकरिता मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गाव सर्वपक्षीय विकास  समिती सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका मध्ये करण्याची अंतिरीम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी  यावेळी दिले.
कल्याण मधील १४ गावांना नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट  करण्यासाठी येथील गावकऱ्यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४ गावांच्या विकासाचा प्रश्न मांडला होता. तसेच विधानसभा अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांच्या समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सदर १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषण २४ मार्च २०२२ रोजी केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने मागील वर्षी  हरकती, सूचनांकरीता १२ सप्टेंबर २०२२ रोजी  अधिसूचना जाहीर केली होती. त्यावर एकही हरकत न  आल्याने या १४ गावांचा नवी  मुंबई महापालिका मध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, या निर्णयाबाबत आजतागायत अंतरिम अधिसूचना न काढल्याने या १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत अजून करण्यात आला नाही. त्यामुळे या गावांचा विकास अजूनही खुंटलेला आहे. कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका मध्ये करण्याची अंतरिम अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गावातील सर्वपक्षीय विकास समिती सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली.यावर अंतिरीम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश लवकरच नवी मुंबई महापालिका मध्ये होणार आहे.

विकास कामांसाठी १४० कोटी निधी जाहीर
कल्याण ग्रामीण भागातील १४ गावे नवी मुंबई महापालिका मध्ये समाविष्ट करण्याबाबत अद्यापही अंतरिम अधिसूचना न काढल्याने येथील विकास कामे ठप्प झाला आहे, असे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अंतरिम अधिसूचना निघेपर्यंत या गावांच्या विकास कामांसाठी नगरविकास विभागातून ७० कोटी तसेच ‘एमएमआरडीए'च्या माध्यमातून ७० कोटी असे एकूण १४० कोटी निधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

१५ सप्टेंबर पर्यंत भंडार्ली डम्पिग बंद?
भंडार्ली डम्पिंगची मुदत संपल्यानंतरही ठाणे महापालिका याठिकाणी कचरा टाकत आहे. यातून निर्माण होणारी कचऱ्याची दुर्गंधी, त्यातून वाहणारे सांडपाणी यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यामुळे भंडार्ली डंपिग ग्राउंडमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलने केली आहेत. त्यामुळे भंडार्ली डंपिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर येत्या १५ सप्टेंबर २०२३ पूर्वी भंडार्ली येथील डंपींग बंद करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी  आमदार राजू पाटील यांना दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मणिपूर घटने संदर्भात उरणमध्ये महाविकास आघाडीतर्फे जोरदार निदर्शने