मणिपूर घटने संदर्भात उरणमध्ये महाविकास आघाडीतर्फे जोरदार निदर्शने
देशातील नागरीकांमध्ये जाती धर्माच्या नावाने भेद करणाऱ्या पासून सावध राहण्याचे आवाहन
उरण : मणिपूर येथील महिला अत्याचाराच्या विरोधात मंगळवारी ( दि. २५) उरणमध्ये महाविकास आघाडीतील घटक व डाव्या पक्ष संघटनांनी गांधी चौकात केंद्र व मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी महिला,कामगार,शेतकरी व युवक संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी महिला अत्याचाऱ्यांवर दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींना कडक शिक्षा द्यावी, मणिपूर मधील घटनेमुळे देशाची जगात नाचक्की झाली आहे. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन निःपक्षपाती कारवाई करावी. दोषींना कडक शिक्षा करावी, त्याचप्रमाणे देशातील नागरीकांमध्ये जाती धर्माच्या नावाने भेद करणाऱ्या पासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना (उध्दव ठाकरे) माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी (शरद पवार) राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, कामगार नेते कॉ. भूषण पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, माकप रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे, किसान सभा नेते संजय ठाकूर, जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, रायगड अध्यक्ष अमिता ठाकूर,शेकाप च्या सीमा घरत, काँग्रेस पक्षाच्या रेखा घरत, डीवायएफआय युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.