इमारत बांधकामामुळे गोवर्धनी माता मंदिराला धोका
मंदिरस्थळी दुर्घटना घडल्यास बिल्डर जबाबदार -आ. मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : बेलापूर किल्ले गांवठाण येथील आई गोवर्धनी मंदिराच्या पायथ्याशी विकासकांनी अनधिकृत बांधकाम करण्यात येत असून त्यासाठी या इमारतींच्या खोदकामात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. माती उत्खनन करताना संबंधित विकासकांनी कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत न बांधल्यामुळे आई गोवर्धनी मंदिराच्या पायथ्यापासून आणि मंदिराच्या मुख्य दरवाजा पर्यंतचा काही मातीचा भाग पावसामुळे ढासळला गेला आहे. परिणामी, मंदिराच्या पायऱ्या आणि मंदिराच्या दरवाजाचा मुख्य भाग पडून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आई गोवर्धनी मंदिराला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊन दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी संबंधित विकासक जबाबदार राहील, असा इशारा ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षेतेखाली अतिवृष्टी, महापुराचे नियोजन-उपाययोजना करण्याबाबत २२ जुलै रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गोवर्धनी मंदिराला निर्माण झालेल्या धोवयाची बाब पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आणली. तसेच त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची ना. शंभूराज देसाई यांना विनंती केली.
बेलापूर किल्ले गांवठाण येथे पेशवेकालीन आई गोवर्धनी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात बाराही महिने नवी मुंबई, ठाणे, रायगड, भिवंडी, पालघर अशा विविध जिल्ह्यामधून भाविक भक्त दर्शनला येत असतात. तसेच नवरात्रोत्सवात गोवर्धनी मंदिरात नऊ दिवस मोठे उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे पंचक्रोशीत गोवर्धनी मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे विकासकडून करण्यात आलेल्या खोदकामामुळे गोवर्धनी मंदिराला धोका निर्माण झाल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
प्रथमतः नवी मुंबईत सिडको, नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी अशी तीन प्राधिकरणे असल्यामुळे प्रामुख्याने एमआयडीसी भाग पूर्णतः दगडखाणीने
व्यापला असून तिथे डोंगरांच्या खालील परिसर संपूर्ण झोपडपट्टीने व्यापलेले आहे. सदर ठिकाणी दरवर्षी पावसळ्यात दुर्घटना होत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा आणि उपायोजना उपलब्ध करुन देण्यात याव्यात. विशेषतः रात्री पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. महापालिका मार्फत सदर ठिकाणी आपत्कालीन चौकी किंवा तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय उभारले तर स्थानिक नागरिकांना आपत्कालीन समयी योग्य ती मदत मिळण्यास सोप होईल, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे बैठकीत म्हणाल्या.
नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या जास्त असल्याने या अति पावसामुळे दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे धोकादायक इमारतीमधील नागरिकांना वेळीच इमारत खाली करण्यास महापालिकेद्वारे नोटीस देण्यात यावी आणि त्यांचे योग्य त्या सर्व सुविधायुक्त ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे. तसेच नवी मुंबईमध्ये संक्रमण शिबीर निर्माण न ल्यामुळे ज्याप्रमाणे जिमी टॉवरची दुर्घटना झाली, त्यावेळेस नागरिकांना नवी मुंबईमधील विविध भवन मध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. त्याप्रमाणे धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. पण, त्या इमारतीमधील काही उच्चभ्रू नागरिक कुठेही राहण्यास तयार होत नाही. धोकादायक इमारतींमधील अशा काही नागरिक त्या खाली करण्यास तयार होत नाही. त्यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांसाठी लवकरात लवकर राहण्याची उपाययोजना करुन धोकादायक इमारती खाली कराव्यात, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
सदर बैठकीप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार राजू पाटील, आमदार गीता जैन, आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, विभागीय तहसीलदार तसेच संबंधित विभागातील पोलीस आयुक्त,महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.