मणिपूर वाचवा...नवी मुंबईकरांची राष्ट्रपतींना हाक!

 

सीवुडस्‌ मध्ये ‘शिवसेना'च्या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

नवी मुंबई : अवघ्या देशाची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या मणिपूर मधील महिला भगिनींवरील अत्याचाराच्या घटनेने नवी मुंबईकर जनता देखील संतप्त आणि व्यथित झाली आहे. या नृशंस घटनेचा निषेध म्हणून नागरिकांनी थेट राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मु यांना साकडे घातले आहे. मणिपूर मधील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पोस्टकार्ड राष्ट्रपती मुर्मु यांना नागरिकांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात येत आहे.

‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'चे सीवुडस्‌ पश्चिम विभागप्रमुख समीर अमीन बागवान यांच्या पुढाकाराने सीवुडस्‌ रेल्वे स्टेशन, डी-मार्ट परिसरात एक पोस्टकार्ड मणिपूरसाठी... अशी मोहीम विशेषतः महिला भगिंनीसाठी राबवण्यात आली. या मोहिमेत सहभागी होत अनेक नागरिकांनी आपली नावे आणि पत्ता पोस्टकार्डवर नोंदवली. यामध्ये महिला माता-भगिनींचा सहभाग लक्षणीय होता. सदर सर्व पत्रे तातडीने राष्ट्रपती भवनाला पाठवण्यात येणार असून राष्ट्रपतींनी याची दाखल घ्यावी, अशी अपेक्षा सीवुडस्‌वासियांनी व्यक्त केली.

सदर उपक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख सुमीत्र कडू, संतोष घोसाळकर, माजी नगरसेवक काशीनाथ पवार, विभागप्रमुख मिलींद भोईर, संतोष दळवी, विशाल विचारे, उपविभागप्रमुख राजेश घाडगे, संतोष पाटील, प्रकाश पारकर, शाखाप्रमुख जितेंद्र कोंडस्कर, विद्याधर महाडेश्वर, आशिष गायकवाड, संतोष सावंत, युवा सेना विभाग अधिकारी केदार बनसोडे, शिवसैनिक जस्मिन बागवान, सीमा संकपाळ, दत्ता साबळे, शिवम ठाकुर, उदय बारगुडे, आदिंनी सहभाग नोंदविला.

पत्रात काय?
आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मुजी नमस्कार,  मी खाली सही करणार, या देशाचा सर्वसामान्य नागरिक, या पत्राद्वारे आपणास नम्र निवेदन करत आहे. जवळपास गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेले मणिपूर राज्य जातीय हिंसाचाराच्या भीषण आगीत होरपळून निघत आहे. या हिंसाचारात दिडशेहून अधिक निष्पाप नागरिकांचा नाहक जीव गेला आहे. नुकतीच एक अतिशय बिभत्स आणि तितकीच संतापजनक घटना मणिपूरमध्ये घडली. कुकी जनजातीच्या समुहातील दोन महिलांवर सामुदायिकरित्या अनन्वित अत्याचार करत त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तुम्ही देशाच्या सर्वोच्च पदावर आहात. तुम्ही स्वतः महिला सुध्दा आहात. मणिपूर मध्ये घडणाऱ्या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण शांत का आहात? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला छळत आहे. राष्ट्रपती महोदया, देशाच्या राष्ट्रपती म्हणून आणि एक महिला म्हणून आपली शक्ती वापरण्याची हीच ती वेळ आहे. मणिपूर मधील महिलांच्या रक्षणासाठी, तेथील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण कृपया पुढाकार घ्यावा.

मणिपूर राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत, ही विनंती.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 इमारत बांधकामामुळे गोवर्धनी माता मंदिराला धोका