‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'तर्फे ‘दि.बा.पाटील चळवळ स्पर्धा'चे आयोजन

स्पर्धेच्या माध्यमातून ‘दिबां'चे समर्पित कार्य जगासमोर आणणार - दशरथ भगत

नवी मुंबई : देशातील भूमीपुत्र आणि प्रकल्पबाधितांचे अर्ध्वयू लोकनेते दि. बा. पाटील यांच्या लोकसेवेसाठी समर्पित आणि संघर्षमय कार्यास उजाळा देऊन कलेच्या माध्यमातून मूलभूत हक्काची जाणीव, संघर्ष याबद्दल ऊर्जा प्रज्वलित व्हावी. तसेच त्या माध्यमातून विद्यमान आणि पुढील पिढीस संघर्षासाठी प्रेरीत करणे या उद्देशाने ‘दि.बा.पाटील चळवळ स्पर्धा' या स्पर्धात्मक स्फुर्तीदायी उपक्रमाचे ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

संघर्षाचे ऊर्जास्थान लोकनेते ‘दिबां'ची विविध प्रकारची आंदोलने आणि सभागृहातील संसदीय कार्याचा जाज्वल्य इतिहास शोध, बोध घेऊन आर्टिकल (लेख) लिहिणे, व्हिज्युअल डॉक्युमेंटरी (माहितीपट) बनविणे, ‘दिबां'च्या संघर्षशील जीवनातील एखादे आंदोलन समोर ठेवून किंवा कार्याच्या महतीपर स्फुर्तीगीत (लेखन, व्हिडीओ, ऑडीओ) बनविणे, आंदोलनाची चित्र रेखाटने, लघुपट बनविणे, लघुपटाचे पोस्टर डिझाईन साकारणे या स्पर्धा अमर्याद ( राज्यासह देशातील सर्वांसाठी ) क्षेत्रासाठी असतील. तर यंदाच्या श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून श्रींसमोर याच संदर्भित विषयांवर आरास देखावा करणे, अशी स्पर्धा देखील सदर उपक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. सदर स्पर्धा केवळ नवी महापालिका क्षेत्रातील घरगुती (ग्रामीण, शहर, झोपडपट्टी अशा तिन्ही गटांमध्ये) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी खुल्या गटात असणार असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.

सदर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धा व्यवस्थापक ऋतुजा भगत (८८५०३१५७९५) यांच्याशी संपर्क साधावा किंवा[email protected] या मेलवर, किंवा दि.बा. स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धा या फेसबुक पेजवर आणिsphurtisthan / दि. बा. स्फूर्तीस्थान स्पर्धा या इन्स्टाग्राम पेजवर संपर्क साधावा किंवा फॉलो करावे, असे आवाहन देखील दशरथ भगत यांनी केले आहे.

सदर स्पर्धेच्या आयोजनातून संकलित होणारे विविध रुपातील साहित्य जनआंदोलनांना बळ देण्यासाठी ग्रंथालय स्वरुपात उपलब्ध व्हावे, मुख्यत्वे करून होवू घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील हेच नामकरण व्हावे अशा प्रमुख ध्येयासह सदर स्पर्धेतील सहभागी स्पर्धक बाधित नागरिकांना प्रत्यक्ष न्यायिक लाभ देण्यास प्रेरीत व्हावेत, हीच प्रेरणादायी कृती समाधानकारक राहील. या ऊर्जामय हेतूने या ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'तर्फे ‘दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा' उपक्रमाच्या आयोजन करण्यात आल्याचे भगत म्हणाले.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘संयोजन समिती'मधील रविंद्र वाडकर (जेष्ठ लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी), सुधाकर लाड (छायाचित्रकार, शिवप्रेमी इतिहास अभ्यासक),  प्रशांत निगडे (लेखक, दिग्दर्शक, अभिनेते-निर्माते), गज आनन म्हात्रे (कवी, लेखक, नाटककार, पर्यावरण स्नेही), रामनाथ म्हात्रे (गीतकार, संगीतकार, लोकगायक,कलावंत), डॉ. विवेक भोईर (प्राध्यापक, शोध प्रबंध लेखक), ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे प्रवक्ता तथा सहसचिव शैलेश घाग तसेच ‘दि. बा. पाटील भूमीपुत्र ठेकेदार संघटना'चे अध्यक्ष जितेश म्हात्रे आणि ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे पदाधिकारी संजय यादव, विलराव यादव, देवेंद्र खाडे, चंद्रकांत काळे, आदि उपस्थित होते.  

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आप'तर्फे पनवेल न्यायालयात करण्यात आलेल्या तक्रारीवर सुनावणी