नवी मुंबईतील नागरी समस्या सोडवा
विजय नाहटा, विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचे पालिका आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरी भागातील समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून शिवसेना (शिंदे गट) उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ४ जुलै रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेतील ठोक मानधन आणि रोजंदारी पध्दती कर्मचारी यांची पगारवाढ करण्यात यावी, त्यांना सार्वजनिक रजा मंजूर करण्यात याव्यात, रोजंदारी सह ब्रेक पध्दत बंद करण्यात यावी, महापालिकेतील विविध विभागात काम करणाऱ्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ तसेच त्यांनी आजवर केलेल्या सेवेचा विचार करता त्यांना महापालिका सेवेत कायम करणे, अंगणवाडी-बालवाडी सेविकांना कायम सेवेत सामावून घ्यावे, त्यांच्या पगारात वाढ करणे त्याच प्रमाणे नवी मुंबई परिसरातील ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ, सीवुडस्, बेलापूर येथील नागरी वस्तीतील समस्या सोडवण्यासंदर्भात आयुक्त राजेश नार्वेकर यांना यावेळी निवेदने देण्यात आले.
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यात यावीत. तसेच झोपडपट्टी विभागातील आणि गांव-गांवठाण विभागातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात, अशी मागणी उपनेते विजय नाहटा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. शाळा सुरु झाल्या असून आजपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, रेनकोट आणि इतर शालेय साहित्याचे वाटप झाले नसून शालेय साहित्याचे वाटप लवकरात लवकर करण्याची मागणी देखील आयुवत नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली.
जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी नवी मुंबईतील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांची यादीच आयुक्तांना वाचून दाखवली. नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांंची सोडवणूक व्हावी म्हणून विविध प्रभागातील मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. जिल्हासंपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनीही वाशीतील नागरिकांचे प्रश्न मांडून ते तात्काळ सोडविण्याची मागणी केली. दरम्यान, सदर सर्व निवेदनांचा स्वीकार करत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विविध समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, महिला जिल्हा संघटक शितल कचरे, शहर संघटक सुरेखा गव्हाणे, नंदा काटे, माजी नगरसेवक संजू वाडे, ममीत चौगुले, ज्ञानेश्वर सुतार, रामआशीष यादव, प्रशांत पाटील, विलास भोईर, स्वप्ना गावडे, जगदीश गवते, रामशेठ वाघमारे, उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, अजित सावंत, गणपत शेलार, दीपक सिंग, कमलेश वर्मा, सह संपर्क प्रमुख सचिन कांबळे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख साईनाथ वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.