निवडणूक ओळखपत्र ‘आधारकार्ड'शी जोडण्याची मागणी

आ. मंदाताई म्हात्रे यांचे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना पत्र

नवी मुंबई : विविध निवडणुकांमधील बोगस आणि दुबार मतदारांवर अंकुश ठेवतानाच दुबार आणि त्रिबार मतदार नोंदणीवरही निर्बंध आणण्याच्या अनुषंगाने निवडणुकांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी प्रत्येक मतदाराचे निवडणूक ओळखपत्र ‘आधारकार्ड'शी लिंक (जोडावे) करावे, अशी मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे पत्राद्वारे  केली आहे.

भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजरा होत असतो. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच; पण बोगस मतदान या निवडणुकांमधील खरी समस्या आहे. एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे या मतदाराचा सर्वत्र संचार राहून तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा निवडणुकीच्या निकालावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे या बोगस आणि दुबार मतदारांना आळा घालण्यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी निवडणूक ओळखपत्र ‘आधारकार्ड'शी जोडावे म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी  केली आहे.


निवडणूक ओळखपत्र ‘आधारकार्ड'शी लिंक केल्यानंतर तर अधिक सुरक्षित करण्यासाठी मदत होणार असून दुबार आणि त्रिबार मतदार नोंदणीवरही निर्बंध बसणार आहेत. तसेच यावर्षी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे मतदार कार्ड आणि पूर्वी असलेल्या मतदारांचे कार्ड ‘आधारकार्ड'शी जोडावे. जेणेकरुन येणाऱ्या लोकसभा किंवा इतर सार्वत्रिक निवडणुकांवेळी मतदानामध्ये पारदर्शकता दिसून येईल. शिवाय दुबार आणि त्रिबार असलेल्या मतदार नावांच्या याद्या रद्दबादल करण्यास निवडणूक आयोगाला मदत होईल. नावामधील साम्य असलेलेही बोगस मतदार देखील कमी होतील, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद  केले आहे. 
 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था