पुस्तक प्रदेश : २१७ पुस्तकांचा परिचय
अनिल बळेल यांच्या पुस्तक प्रदेश या २५८ पानी पुस्तकात लेखकाने २१७ पुस्तकांचा परिचय दिला आहे. एकाच वेळेस एकाच पुस्तकात इतक्या पुस्तकांची समीक्षा असणारे बहुधा हे पहिलेच पुस्तक असावे. हे पुस्तक साहित्याचे अभ्यासक, मराठीचे प्राध्यापक तसेच ग्रंथपाल यांच्यासाठी माहितीचा खजिना आहे.
या पुस्तक प्रदेशात फेरफटका मारताना वाचकांना अनेक लेखकांच्या विविध प्रकारच्या पुस्तकांचा परिचय होतो. यात विविधता आहे. आपण २१७ पैकी काही मोजक्या पुस्तकांच्या परिचयाची माहिती घेऊ.
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या भूप ह्या दीर्घ कथा संग्रहाची माहिती येथे आहे.
व.बा.बोधे हे ग्रामीण कादंबरीकार म्हणून ओळखले जात असले तरी तरी ते चांगले वक्ते होते. आपण वक्ता कसे झालो हे सांगण्यासाठी त्यांनी वैखरीचा वारकरी ( वैखरी म्हणजे वाणी - वाचा ) हे पुस्तक लिहिले आहे.त्याचा परिचय आहे.
जवाहरलाल दर्डा यांच्या पत्नी यांनी योगायोग ह्या पुस्तकात आपली प्रेम कहाणी दिली आहे.
रेखा बैजल यांनी जलपर्व ह्या पुस्तकात पाणी समस्ये संदर्भात अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.
बहुरुप गांधी हे बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या व शोभा भागवत यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचा परिचय दिला आहे.
श्यामची आई चित्रपटामुळे वनमालाबाई प्रकाशझोत आल्या. त्याचप्रमाणे त्या टीकेच्या धनी झाल्या. त्यांचे अनुभव सुनील पाटणकर यांनी शब्दांकन करून परतीचा प्रवास ह्या नावाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची माहिती दिली आहे.
पावसानंतरचं उन ह्या कथा संग्रहाचा परिचय आहे.
वक्तृत्व हया पुस्तकात प्रा.संजय थोरात या नामवंत वक्त्याचे तीस वर्षांचे अनुभव कथन आहे.
शिरीष कणेकर यांचे फटकेबाजी हे क्रिकेट संदर्भातील पुस्तक, ध्वजा हा वसंत नरहर फेणे यांचा कथा संग्रह , लगनगंधार हा सरिता पत्की यांचा कविता संग्रह, अनादी अनंत हा पंकज कुरुलकर यांचा कथा संग्रह, आम्ही भगीरथाचे पुत्र ही गो.नी.दांडेकर यांची कादंबरी, चौरंग हा आशुतोष उकिडवे यांचा कथा संग्रह, माणूस आणि लेखक हे श्री.ना.पेंडसे यांचे आत्मचरित्र, होम ही रोहिणी झेंडे यांची कादंबरी, खेळखंडोबाच्या नावानं हा प्रवीण दशरथ बांदेकर यांचा कविता संग्रह, ग्रंथ, ग्रंथालय, ग्रंथसंस्कृती हे प्रदीप कर्णिक यांचे पुस्तक, आवर्त ही म.वि.कोल्हटकर यांची ग्रामीण कादंबरी, निशाणा डावा अंगठा ही रमेश इंगळे- उन्नादकर यांची कादंबरी, सांजसूर हा अनिल रघुनाथ कुलकर्णी यांचा कथासंग्रह इत्यादी दोनशे सतरा पुस्तकांची समीक्षा असलेले पुस्तक प्रदेश हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
एकाच वेळेस एकाच पुस्तकात इतक्या पुस्तकांची समीक्षा असणारे माझ्या वाचनात आलेले हे पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक साहित्याच्या अभ्यासकांना, मराठीच्या प्राध्यापकांना तसेच ग्रंथपाल यांच्यासाठी माहितीचा खजिना आहे. ग्रंथपाल यांनी हे पुस्तक वाचले तर आपल्या ग्रंथालयात यापैकी कोणते पुस्तक नसेल तर ते खरेदी करता येईल.
पुस्तकप्रदेश (समीक्षा) लेखक - अनिल बळेल
प्रकाशक - अक्षर मानव प्रकाशन
पहिली आवृत्ती - फेब्रूवारी २००९
पृष्ठे - २५८ मूल्य - १५० रुपये
-दिलीप प्रभाकर गडकरी