गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

यासाठी ‘गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन' या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. सदर पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.

शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण आणि शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांनी पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या संदर्भात जाहीरात आणि सूचना प्रसिध्द करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, सदर निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेलमध्ये वनविभागाची धडक कारवाई :