केडीएमसी क्षेत्रातील विविध समस्यांबाबत ‘बसपा'चे आयुक्तांना साकडे
कल्याण : ‘बहुजन समाज पार्टी'च्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. यावेळी आयुवत गोयल यांच्यासमोर दलित वस्त्यांमधील मुलभूत समस्यांचे तातडीने निवारण करण्यात यावे. तसेच दलितांच्या शक्तीस्थळांना त्वरित संरक्षण देत त्यांचे जतन करावे. याचबरोबर विविध मागण्या शिष्टमंडळाने मांडल्या.
याप्रसंगी ‘बसपा'चे प्रदेश सचिव, ठाणे जिल्हा प्रभारी सुदाम गंगावणे, कल्याण शहर उपाध्यक्ष विजय सोनवणे, कल्याण शहर सचिव बाळू भोसले, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनावणे, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष गौतम कांबळे, कल्याण शहर अध्यक्ष सिध्दार्थ सोनवणे, कल्याण पश्चिम विधानसभा सचिव मंगेश ओव्हळ, मोहने शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कल्याण पूर्व ‘ड' प्रभाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या दर्शनी भागात पुनालिंक रोड दिशेने पुनर्स्थापित करावा. तसेच निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे उर्वरित बील तत्काळ थांबवावे. ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी. कल्याण (पश्चिम) येथील १९६२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विस्तारीकरण सुशोभिकरण जागेचा प्रशासकीय ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा. सदर ठिकाणी ऐतिहासिक घटनेचे स्मारक तयार करावे. महापालिका क्षेत्रातील दलित वस्तांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण कराव्यात. आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एससी, एसटी प्रवर्गाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नव्याने तयार होणाऱ्या प्रभाग रचनेत वाढ करावी. महाराष्ट्र राज्य शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रात एमएनएचआरए कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांची बंद प्राथमिक केंद्रे पुन्हा सुरु करावी, तिथे अपूर्ण सोयी-सुविधा पूर्ण कराव्यात. महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत एसी, एसटी प्रवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांचे मानसिक शोषण केले जाते, याची निःपक्ष चौकशी करुन संविधानिक धोरणानुसार संरक्षण द्यावे.
तसेच नगरपालिकेच्या नगररचना विभागात वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात याव्यात. अशोकनगर कल्याण पूर्व येथील ‘बुध्दभूमी फाऊंडेशन'ची जागा संरक्षित करुन रस्ता रुंदीकरण विकासाच्या नावाने ‘फाऊंडेशन'च्या बाधीत जागेचा मोबदला त्यांना देण्यात यावा. कल्याण पश्चिमेतील आरटीओ ऑफीस ते बी. के. नगर रस्ता रुंदीकरणात नगररचना विभागाचे सीमांकन सत्ताधारी पक्षातील नेत्याचा बंगला वाचवण्यासाठी चुकीचे करुन मागासवर्गीय लोकांची घरे तोडली. त्याविरोधात कारवाई करुन नव्याने सीमांकन पुन्हा करावे, आदि मागण्या यावेळी शिष्टमंडळाने आयुक्त अभिनव गोयल यांंच्याकडे केल्या आहेत.