नारळी पौर्णिमा मुहूर्तावर समुद्रात झेपावणार होड्या
वाशी : येत्या ९ ऑगस्ट रोजी आगरी-कोळी समाजाचा नारळी पौर्णिमा सण सर्वत्र साजरा होणार आहे. या सणाच्या मुहूर्तावर आगरी-कोळी लोक दर्या देवाला नारळ अर्पण करुन आपल्या होड्या समुद्रात उतरवतात. त्यामुळे होड्यांची डागडुजी पूर्ण करुन होड्या समुद्रात उतरविण्यासाठी नवी मुंबई आणि परिसरातील मच्छीमार सज्ज झाले असून, नारळी पौर्णिमा निमित्त कोळीवाड्यांसहीत ठिकठिकाणच्या मासेमारी जेट्टी सजल्या आहेत.
किनारपट्टीवरील कोळी बांधवांची सक्तीची विश्रांती संपत आली असून, पोटाची खळगी भरण्यासाठी कोळीवाड्यात मच्छीमारांची खोल समुद्रात पारंपरिक मासेमारीसाठी आपल्या होड्या समुद्रात लोटण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर येत्या ९ ऑगस्ट पासून एक नवी आशा घेऊन ‘आई एकविरा आणि जय मल्हार', असा जयघोष करीत कोळी राजा दर्याकडे झेपावणार आहे. यासाठी नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा, बेलापूर, सारसोळे, करावे, वाशी गाव, जुहूगाव, बोनकोडे, कोपरखैरणे, दिवा कोळीवाडा येथील मच्छिमारांची लगबग सुरु झाली आहे. गेली दोन महिने पाऊस, वादळीवारा आणि समुद्राच्या उधाणामुळे समुद्रातील मासेमारी बंद होती. त्यामुळे मच्छिमारांनी त्यांच्या बोटी बंदर किनारपट्टीवर नांगरुन ठेवणे पसंत केले होते. मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलै रोजी संपुष्टात आला. १ ऑगस्ट पासून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असली तरी मच्छीमार मासेमारीसाठी नारळी पौर्णिमेचाच मुहूर्त साधतात.त्यामुळे नारळी पौर्णिमेची लगबग कोळीवाड्यात सुरु झाली आहे. बोटीची डागडुजी, इंधन दुरुस्ती, रंगरंगोटी, मच्छीमार जाळ्यांची देखभाल आणि होड्यांना तेल लावणे आदी कामे पुर्ण झाली आहेत.
साधारण पावसाळ्याच्या प्रारंभापासून खवळलेला नारळी पौर्णिमापासून समुद्र शांत होतो. मोठ्या बोटींची वर्दळ कमी असल्याने समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे बंदी काळात मासेमारीसाठी मच्छीमारांना खोल समुद्रात जावे लागते. खोल समुद्रातील एका फेरीसाठी ८ ते १० दिवस खर्ची घालावे लागतात तसेच एका मासेमारी फेरीसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी पारंपरिक जुन्या पध्दतीने पकडली जाते. चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोग्य असलेली खोल समुद्रातील मासळी पकडणाऱ्या मच्छीमारांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे.
मासेमारी मुख्यतः १० महिन्यांचा व्यवसाय असून, उर्वरित दोन महिने म्हणजे जून आणि जुलै महिना मासळी प्रजनन हंगामामुळे मासेमारी बंदीचे असतात. या काळात मच्छीमारांना उत्पन्नाचा प्रमुख स्र्त्रोत बंद झाल्याने सुक्या मासळीचा पर्याय म्हणून बोंबील, जवळा, आंबार, वाकटी, सुके सोडे आदींमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते. पूर्वी लाकडी बोटी असल्याने मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करावी लागत होती. मात्र, आता अनेक मच्छीमार फायबर बोटींवर अवलंबून असल्याने बोटी डागडुजीचा खर्च लाकडी बोटींच्या तुलनेने कमी झाला आहे. - तुकाराम कोळी, अध्यक्ष - डोलकर मच्छिमार संस्था, नवी मुंबई.